
अंबाजोगाई – रमाकांत पाटील
भाजप नगरसेवक विजय जोगदंड यांच्यावर अंबाजोगाई येथील रविवार पेठेतील पाण्याच्या टाकीजवळ हल्ला करून त्यांची हत्या करण्यात आली. शुक्रवारी रात्री आठ वाजता ही घटना घडली असून या घटनेने अंबाजोगाईत खळबळ उडाली आहे.
अंबाजोगाई नगर पालिकेतील भाजपचे नगरसेवक विजय शेषेराव जोगदंड (वय ३४, रा. परळी वेस, अंबाजोगाई) यांची आज रात्री ८ वाजण्याच्या सुमारास हत्या झाल्याची खळबळजनक घटना घडली. परळी वेस येथे झालेल्या भांडणात तीक्ष्ण हत्यारांच्या साह्याने जोगदंड यांच्यावर वार करण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे. गंभीर जखमी अवस्थेत त्यांना स्वाराती रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, तिथे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. वरिष्ठ पोलीस अधिकारी रुग्णालयात दाखल झाले असून पुढील कार्यवाही सुरू आहे.


























































