
कर्नाटक विधानसभा निवडणुकांसाठी भाजपने आपला जाहीरनामा जारी केला आहे. त्यात कर्नाटकच्या जनतेला अनेक आश्वासनं देण्यात आली आहेत. विशेष म्हणजे राज्यात समान नागरी कायदा लागू करण्याचं आश्वासन भाजपने कानडी जनतेला दिलं आहे.
आपल्या जाहीरनाम्यात भाजपने कर्नाटकच्या जनतेसाठी घोषणांची खैरात केली आहे. समान नागरी कायदा आणि एनआरसी लागू करण्यासाठी उच्च स्तरीय समिती स्थापन केली जाईल. समान नागरी कायद्यासह दर वर्षी प्रत्येक कुटुंबाला तीन गॅस सिलिंडर मोफत, उगादी, गणेश चतुर्थी आणि दिवाळीला प्रत्येक महापालिकेकडून वॉर्डनिहाय मोफत जेवण मिळावं म्हणून अटल आचार केंद्र पोषण योजना, दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना प्रतिदिन अर्धा लिटर नंदिनी दूध, प्रतिमहिना श्रीअन्न-श्रीधान्य रेशन किट दिला जाईल, अशी आश्वासनांची रेवडी भाजपने कर्नाटकच्या जनतेला दिली आहे.
तसंच, राज्यातील दहा लाख बेघर लोकांसाठी घरांची सोय, महिला तसंच अनुसूचित जाती-जमातींसाठी पाच वर्षांची दहा हजार रुपयांची मुदत ठेव योजना, सरकारी शाळांना वैश्विक स्तरावरील मापदंडांनुसार अद्ययावत करणे, ज्येष्ठ नागरिकांसाठी दरवर्षी मोफत वैद्यकीय तपासणी, वोक्कालिंग आणि लिंगायत समाजाच्या आरक्षणात दोन दोन टक्क्यांची वाढ, तीन लाख महिलांसाठी फ्री बस पासेस योजना, पीएफआय आणि अन्य जिहादी संघटनांवर बंदी, तिरुपती, अयोध्या, काशी, रामेश्वरम, कोल्हापूर, सबरीमाला आणि केदारनाथ यात्रेसाठी गरीब कुटुंबांना 25 हजार रुपयांची आर्थिक मदत, मंदिर प्रशासनांना स्वायत्ततेचा दर्जा देण्यासाठी समितीची स्थापना आणि राज्याची राजधानी बेंगळुरूला राज्य राजधानी प्रदेश दर्जा अशा विविध योजनांची आश्वासनं दिली आहेत.






















































