
केंद्रातील भारतीय जनता पक्षाचे सरकार महाराष्ट्रातील सर्व रोजगार आणि संपत्ती निर्मितीची क्षेत्रे खेचून गुजरातला नेत आहे, अशी टीका शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी केली.
आशीष चेंबूरकर यांच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन आदित्य ठाकरे यांच्या हस्ते झाले. त्याप्रसंगी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी भाजप सरकारच्या सापत्न वागणुकीवर टीका केली. रोजगार व अन्य क्षेत्रांबरोबरच भाजप सरकारने ‘गिफ्ट सिटी’सुद्धा मुंबईहून गुजरातला नेली, असे ते म्हणाले. “मुंबईला ‘गिफ्ट सिटी’ का मिळत नाही? कोलकात्याला ‘गिफ्ट सिटी’ का मिळत नाही? लखनौ आणि दिल्लीला ‘गिफ्ट सिटी’ का मिळत नाही?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. “देशात विकास हवा असेल तर सरकारने प्रत्येक राज्याला ‘गिफ्ट सिटी’ दिली पाहिजे. सर्वांना समान संधी आणि समान व्यासपीठ दिले पाहिजे,” असे आदित्य ठाकरे म्हणाले.
चित्रपट पुरस्कार सोहळा दिल्लीऐवजी गुजरातला होणार असल्याच्या मुद्द्यावर बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, “परंपरेप्रमाणे काही होत असेल तर त्याला शिवसेनेचा विरोध नाही, पण सर्वकाही ओरबाडून गुजरातला नेले जात आहे. कॉमनवेल्थ गेम्स गुजरातला नेले, ऑलिम्पिकसाठीही गुजरातची निवड झाली, क्रिकेट वर्ल्ड कपची फायनलही वानखेडेला न घेता गुजरातला गेली आणि मग देशाने पाहिले काय झाले ते,” असा टोला त्यांनी भाजप सरकारला लगावला.

























































