वृक्ष लागवडीवरून आज विधिमंडळात वादळाची शक्यता

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

भाजप सरकारच्या काळातील 50 कोटी वृक्ष लागवडीच्या चौकशीचा बुधवारी विधिमंडळात गाजण्याची शक्यता आहे. काँग्रेस पक्षाच्या आमदार हुस्नबानू खलिफे यांनी या विषयावर विधान परिषदेत लक्षवेधी सूचना मांडली आहे. वृक्ष लागवडीची खोटी माहिती देऊन जनतेची दिशाभूल करणाऱया संबंधित अधिकारी व कर्मचाऱयांवर कठोर कारवाईसाठी सरकारने तातडीने कार्यवाही करावी अशी मागणी त्यांनी केली आहे. ही लक्षवेधी चर्चेला आली तर मात्र गदारोळ होण्याची चिन्हे आहेत.

भाजप सरकारमधील तत्कालीन वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी 50 कोटी वृक्ष लागवडीची महत्त्वाकांक्षी योजना आखली होती. पण राज्याचे बहुजन विकास मंत्री विजय वडेट्टीवार यांनी वनमंत्री संजय राठोड यांना पत्र पाठवून या वृक्ष लागवडीची चौकशी करण्याची मागणी केली होती. त्यावर संजय राठोड यांनी या वृक्ष लागवडीच्या चौकशीचे आदेश दिले आहे. आता विधान परिषदेतही हा मुद्दा उपस्थित होणार आहे. काँग्रेसच्या आमदार हुस्नबानू खलिफे यांनी याबाबत लक्षवेधी सूचना मांडली आहे.

राज्याचे गृहनिर्माण मंत्री व मदत व पुनर्वसन मंत्री तसेच नागरिकांकडून या प्रकरणी चौकशीची मागणी होत आहे. त्यामुळे या प्रकरणी लवकरात लवकर चौकशी करण्यात येईल. वृक्षलागवडीची खोटी माहिती देऊन जनतेची दिशाभूल करणा-या संबंधित दोषी अधिकारी व कर्मचाऱयांवर कठोर कारवाई करण्याबाबत सरकारने तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणीही हुस्नबून खलिफे यांनी केली आहे.

प्रत्यक्षात किती झाडे लावली?

राज्यात पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी तत्कालीन वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी 50 कोटी झाडे लावण्याचा संकल्प केला होता. पहिल्या वर्षात तीन कोटी, दुसऱया वर्षात तेरा कोटी आणि तिसऱया वर्षी 33 कोटी झाडे लावल्याचे सांगण्यात आले तरी प्रत्यक्षात किती झाले लावण्यात आली, किती झाडे अस्तित्वात आहेत याचा कोणत्याही प्रकारचा तपशील नसणे तसेच या योजनेसाठी वनविभागाने किंवा मंत्रालयातून कोणत्याही प्रकारच्या निविदा काढण्यात आल्या नसल्याचे आढळून येणे यामुळे लोकप्रतिनिधी व नागरिकांमध्ये वृक्ष लागवडीबाबत शंका निर्माण होते, असे आमदार खलिफे यांनी म्हटले आहे.