आपल्याला भाजप उमेदवारांशीच नाही; तर ‘ईडी’, ‘सीबीआय’ आणि ‘आयटी’शीही लढायचंय!

भारतीय जनता पक्ष निवडणुकीमध्ये आपल्याविरोधात एक नाही तर दोन-तीन उमेदवार उभी करते. एक भाजपचा उमेदवार असतो, तर दुसरा ईडीचा, तिसरा सीबीआयचा आणि चौथा आयटीचा उमेदवार असते. या सर्वांशी आपल्याला लढायचं आहे. त्यांचा मात देऊन जिंकायचं आहे, असे काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे म्हणाले. राजस्थानमध्ये आयोजित एका सभेमध्ये ते बोलत होते.

केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करणाऱ्या मोदी सरकारवर खरगे यांनी हल्लाबोल केला. सरकार विरोधकांविरोधात ईडी, सीबीआयचा वापर करत आहे. आपल्या पक्षाचा एखादा कार्यक्रम असेल त्याच्या आधी किंवा त्याच दिवशी छापे टाकले जातात. का? ही लोकशाही आहे का? असा सवाल खरगे यांनी उपस्थित केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विशेष अधिवेशनाच्या निमित्ताने संसदेची नवीन इमारत पाहायला बोलावले होते. त्यांनी चित्रपट अभिनेत्री, अभिनेत्यांना बोलावले. संसद देशाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी, संग्रहालय नाही, असा टोलाही खरगे यांनी लगावला.

नवीन संसद भवनाच्या लोकार्पण समारंभाला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना बोलावले नाही. हा राष्ट्रपतींचा अपमान आहे. आदिवासी असल्याने त्यांना बोलावण्यात आले नाही. त्याआधी नवीन संसदेच्या पायाभरणीच्या कार्यक्रमाला तात्कालिन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना बोलावले नव्हते, कारण ते (भाजप) अस्पृश्यता मानतात. अस्पृश्यांचे आगमन होताच ते गंगाजलाने ती जागा धुतात, असेही खरगे म्हणाले.