
महेश उपदेव, नागपूर
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २१ जून हा योगा दिवस म्हणून साजरा करायचं जाहीर करत जनतेलाही त्यांनी योग करण्याचा सल्ला दिला. मात्र, त्यांच्याच पक्षाचे नेते त्यांच्या हेतूला हरताळ फासत असल्याचं चित्रं गुरुवारी दिसून आलं. गुरुवारी नागपूर महानगरपालिकेतर्फे यशवंत स्टेडियमवर आयोजित योगदिनाच्या कार्यक्रमाला भाजपाच्या नगरसेवकांनी दांडी मारली. पक्षाचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी हे नसल्यामुळे आमदारही भटकले नाहीत़
गेली दोन वर्षे योगदिनाचा मोठा गाजावाजा करण्यात आला. योगदिन मोठ्या प्रमाणात साजरा करण्याचा निर्धार भाजपाने केला होता. मात्र, या मेगा इव्हेंटकडे भाजपाच्या नगरसेवकांनीच पाठ फिरवली. नागपूर महापालिकेत भाजपाचे १०८ नगरसेवक आहेत. विश्व योगदिनाचे औचित्य साधून नागपूर महानगरपालिकेतर्फे विविध योगाभ्यासी मंडळे आणि संस्थांच्या सहकार्याने स्थानिक यशवंत स्टेडियम येथे गुरुवारी योगदिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शहरातील आमदारांपैकी केवळ मिलिंद माने उपस्थित होते. तर, नगरसेवकांपैकी कार्यकारी महापौर दीपराज पार्डीकर व स्थायी समिती सभापती वीरेंद्र कुकरेजा यांच्यासह प्रवीण दटके, नागेश सहारे, दिलीप दिवे, संजय बंगाले, धर्मपाल मेश्राम, प्रमोद तभाने, सुनील अग्रवाल, संगीता गिऱ्हे, दिव्या धुरडे, उज्ज्वला शर्मा ही मंडळी उपस्थित होती. महापौर नंदा जिचकारदेखील विदेशात असल्यामुळे योगदिनाचा कार्यक्रम पार बारगळला.
बॉक्स
लोकांनीही फिरविली पाठ
आंतरराष्ट्रीय योगदिनाचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर करण्यासाठी भाजपाने कंबर कसली होती. यासाठी नागपुरातील यशवंत स्टेडियममध्ये २० हजार लोकांना एकाचवेळी योगासने करता येईल, अशी व्यवस्था केली होती. या कार्यक्रमाला स्वत: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उपस्थित राहतील, असे सांगण्यात आले. मात्र, गडकरी विदेशात असल्यामुळे या कार्यक्रमाची जबाबदारी स्थानिक नेत्यांवर होती.
योगसाधकांमुळे वाचली ‘मनपा’ची अब्रू
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व महापौर नंदा जिचकार शहरात नसल्यामुळे नगरसेवकांनी दांडी मारली. यशवंत स्टेडियम येथे झालेल्या योगदिनाच्या कार्यक्रमाला केवळ दीड ते दोन हजार लोक उपस्थित होते. नगरसेवकांच्या असहयोगामुळे आयोजनांची चांगलीच गोची झाली. नागरिकांचाही या कार्यक्रमाला फारसा प्रतिसाद मिळाला नाही. योगाभ्यासी मंडळाचे योगसाधक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. त्यांनीच खऱ्या अर्थाने महापालिकेची अब्रू वाचविली.
































































