
भारतीय जनता पक्षाचे नेते आणि राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर पिंपरी चिंचवडमध्ये शाईफेक करण्यात आली. महासाधू मोरया गोसावी समाधी महोत्सवासाठी चिंचवड गावात आलेले पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक करण्यात आली. शनिवारी सायंकाळी ही घटना घडली. या घटनेनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना चंद्रकांत पाटील यांनी माझ्यावर झालेली शाईफेक हा भ्याडपणा असून हिंमत असेल तर समोरून या असे आव्हान दिले आहे.
शाईफेकीच्या घटनेनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, मी कार्यक्रमाला चाललो आहे. मी सर्व कार्यक्रम करणार आहे. मी कुणाला घाबरत नाही. असा भ्याडपणे हल्ला करणे चुकीचे आहे. मी चळवळीतला माणूस आहे. अशा प्रकारे पराचा कावळा करणं, योग्य नाही. मी केलेल्या विधानाचा विपर्यास करण्यात आला आहे. मी त्यावर तीनवेळा स्पष्टीकरणही दिलं आहे. हिंमत असेल तर समोरुन या. सर्व पोलीस डिपार्टमेंट बाजूला करतो.
ही झुंडशाही आहे. ही झुंडशाही महाराष्ट्र शासन सहन करणार नाही. याचे जे काही आहे ते मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पाहतील. आम्ही आमच्या कार्यकर्त्यांना खुली छुट दिली असती तर काय झाले असते. पण ही आमचा संस्कृती नाही. शब्दाला शब्दानेही उत्तरं देता येतात, असेही ते म्हणाले.
नक्की काय घडलं?
चंद्रकांत पाटील यांनी गुरुवारी पैठण येथील एका कार्यक्रमात डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केले होते. या विधानामुळे विरोधक चांगलेच आक्रमक झाले होते. त्यांनतर आज देखील या विधानाचे पडसाद सर्वत्र दिसून आले आहे. पिंपरी- चिंचवड येथे एका कार्यक्रमाला असताना चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक करण्यात आली. ही शाईफेक कोणत्या संघटनेकडून करण्यात आलीय हे स्पष्ट झालेले नाही. भाजपचे माजी नगरसेवक ऍड मोरेश्वर शेडगे यांच्या निवास्थानातून बाहेर पडत असताना आंदोलकांनी त्यांच्यावर शाईफेक करत घोषणाबाजी केली. पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतलं आहे.
View this post on Instagram






























































