भाजप नेत्याची जीभ घसरली, योगींच्या नेत्याची तुलना कुत्र्याबरोबर केली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । लखनौ

भाजप नेत्यांमध्ये उलट सुलट विधानं करण्याची सध्या स्पर्धाच सुरू आहे. उत्तर प्रदेशमधील बलिया जिल्ह्याच्या बैरिया मतदारसंघाचे भाजप आमदार सुरेंद्र सिंह यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे मंत्री ओमप्रकाश राजभर यांची तुलना चक्क कुत्र्याबरोबर केली आहे. यामुळे नवीन वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

काही दिवसांपूर्वी ओमप्रकाश राजभर यांनी वाराणसीतील बाबतपुर विमानतळावर सपा नेते शिवलाल यादव यांची भेट घेतली होती. त्यावेळी त्यांनी सिंह यांच्यावर निशाणा साधला होता. ‘हत्ती चालतो तेव्हा कुत्रे भुंकतातच’ असे विधान करत राजभर यांनी सिंह यांना लक्ष्य केलं होत. त्यावर बोलताना सिंह म्हणाले की, ‘ओमप्रकाश राजभर यांचा स्वभावच असे बोलत आहे. हव्यासापोटी कुठेही जाणं हा कुत्र्याचा स्वभाव असतो. यामुळे राजकीय व आर्थिक फायद्यासाठी कुठेही जाणं ही तर कुत्र्याची ओळखं आहे’, असं सिंह म्हणाले.

‘शिवलाल आणि मायावती जिथे चपाती दिसेल तिथे धावत जातील. कारण भाजपने त्यांना जो सन्मान दिला आहे तो त्यांना पचवता येत नाहीये’, असेही सिंह यांनी म्हटले आहे. यापूर्वीही उन्नाव बलात्कार व हत्याप्रकरणी भाजप आमदार कुलदीप सिंगर यांच्या बचावासाठीही सिंह धावून आले होते. तीन मुलांच्या मातेवर कोण बलात्कार करणार असे ते म्हणाले होते. यानंतर महिला आयोगाने त्यांना नोटीस बजावली होती.