गणपत गायकवाड तळोजा कारागृहात

मिंधे गटाचे माजी नगरसेवक महेश गायकवाड यांच्यावर पोलीस ठाण्यातच गोळीबार करणारे कल्याण पूर्वचे भाजप आमदार गणपत गायकवाड यांची आज कळव्याच्या कोठडीतून तळोजा कारागृहात रवानगी करण्यात आली. या गोळीबार प्रकरणी उल्हासनगर न्यायालयाने ठोठावलेली 11 दिवसांची पोलीस कोठडी आज संपल्यानंतर त्यांना पुन्हा कोर्टात हजर करण्यात आले. या वेळी न्यायालयाने गायकवाड यांच्यासह पाच आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली.

जमीन व्यवहारातील मांडवली फिस्कटल्याने 2 फेब्रुवारी रोजी उल्हासनगरच्या हिललाईन पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल जगताप यांच्या दालनातच गणपत गायकवाड यांनी महेश गायकवाडवर गोळीबार केला होता. या प्रकरणी पोलिसांनी गणपत गायकवाड, संदीप सरवणकर, हर्षल केणे, विकी गणात्रा आणि रणजीत यादव या पाच जणांना अटक केली, तर गणपत गायकवाड यांचा मुलगा वैभव आणि नागेश बडेकर हे दोघे अद्याप फरार आहेत. पोलिसांची तीन पथके त्यांच्या मागावर आहेत. दरम्यान, 11 दिवसांची पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर आज सर्व आरोपींना चोपडा न्यायालयात आणण्यात आले. गोळीबारानंतर 3 फेब्रुवारीला गणपत गायकवाड यांना न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्या वेळी त्यांच्या समर्थकांनी घोषणाबाजी केल्यावर त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकाराची पुन्हा पुनरावृत्ती होऊ नये म्हणून भाजप कार्यकर्त्यांना नोटिसा बजावण्यात आल्या होत्या.

एक तास युक्तिवाद
न्यायालयात आज दोन्ही बाजूने एक तास युक्तिवाद चालला. सरकारी वकिलांनी आमदार गणपत गायकवाड यांच्या पोलीस कोठडीत वाढ करण्याची मागणी केली. मात्र सरकारी पक्षाने न्यायालयासमोर कोणतेही नवीन मुद्दे आणले नसल्याचा युक्तिवाद गणपत गायकवाड यांच्या वकिलांनी केला. यानंतर न्यायालयाने गणपत गायकवाड यांच्यासह पाच आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावली. सुनावणी पूर्ण होताच आरोपींची तत्काळ तळोजा कारागृहात रवानगी करण्यात आली.

सुनावणी वेळी संचारबंदी
सुरक्षिततेच्या कारणाने सकाळी 9 वाजता सुनावणी घेण्यात आली. मोठय़ा पोलीस बंदोबस्तात गणपत गायकवाड यांच्यासह सर्व आरोपींना चोपडा न्यायालयात हजर करण्यात आले. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी उल्हासनगरमध्ये संचारबंदी लागू केली होती. शिवाय कोर्ट आवारात 200 मीटरपर्यंत रहदारी बंद केली होती.