शिवरायांचा पुतळा उभारण्यास भाजपचा विरोध, महाराजांवरील बेगडी प्रेमाचा बुरखा फाटला

महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा भाईंदरमध्ये उभारण्यास भाजपने विरोध केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. निवडणुकांमध्ये शिवरायांच्या फोटोचा वापर करून मतांचा जोगवा मागणाऱ्या पालिकेतील सत्ताधारी भाजपने महाराजांच्या पुतळ्यासंदर्भात स्थायी समितीत आलेला प्रस्ताव बहुमताच्या जोरावर फेटाळून लावला आहे. त्यामुळे शिवरायांवरील बेगडी प्रेमाचा भाजपवाल्यांचा बुरखा टराटरा फाटला असून शिवप्रेमी जनतेत संतापाची लाट उसळली आहे. भाजपचा या मोगलाई कारभाराविरोधात शिवसेना ‘जोडे मारो’ आंदोलन करणार आहे.

शिवसेनेचे मीरा-भाईंदर संपर्कप्रमुख व आमदार प्रताप सरनाईक यांच्या पाठपुराव्यामुळे ऐतिहासिक घोडबंदर किल्ल्याचे सुशोभीकरण सुरू आहे. त्या ठिकाणी जाणाऱ्या जंक्शनवर छत्रपती शिवाजी महाराजांचा 30 फूट उंचीचा भव्य पुतळा उभारण्याचा ठराव 2 फेब्रुवारी 2019 रोजी झालेल्या महासभेत एकमताने मंजूर झाला होता. ब्राँझ धातूचा हा पुतळा बनवण्यासाठी 2 कोटी 95 लाख रुपयांची निविदा काढून शिल्पकार नेमण्यासाठी  निविदा मागवण्यात आली होती.

गार्नेट इंटेरियर या कंपनीने याकरिता निविदा सादर केली होती. या निविदेचा प्रस्ताव पालिका प्रशासनाने मंजुरीसाठी स्थायी समितीसमोर ठेवला असता त्याला सत्ताधारी भाजपचे दिनेश जैन यांनी हा प्रस्ताव मंजूर न करता तो नव्याने सादर करावा असे सांगत विरोध केला. त्यानंतर बहुमताच्या जोरावर हा प्रस्तावच भाजपच्या स्थायी समिती सदस्यांनी फेटाळून लावला.

महाराष्ट्राची जाहीर माफी मागा!

निवडणुकांमध्ये छत्रपतींच्या नावाने मते मागायची आणि जेव्हा महाराजांच्या पुतळ्याचा विषय येतो तेव्हा त्यावर असे हीन राजकारण करायचे. भाजपचा खरा चेहरा जनतेसमोर आला आहे. ज्यांनी स्थायी समिती सभेत पुतळ्याला विरोध केला अशा बेगडी भाजप स्थायी समिती सदस्यांना शिवसेना महिला आघाडीतर्फे जोडे मारो आंदोलन करण्यात येईल, असा इशारा आमदार प्रताप सरनाईक यांनी दिला आहे. महाराजांच्या पुतळ्याला विरोध करणाऱ्या भाजपने महाराष्ट्राची जाहीर माफी मागावी. तसेच पुढील स्थायी समिती सभेत हा विषय पुन्हा घेऊन एकमताने तो मंजूर करावा, अन्यथा आम्ही राज्य सरकारकडे जाऊन हा विषय मंजूर करून घेऊ, असेही त्यांनी सांगितले.

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे कलादालनालासुद्धा अशाच पद्धतीने भाजपने आधी विरोध केला होता. त्यानंतर मीरा-भाईंदरच्या जनतेने भाजपला विधानसभा निवडणुकीत त्यांची जागा दाखवली. आता महाराजांच्या पुतळ्याला विरोध करीत आहेत. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीत याचा तडाखा भाजपला नक्की बसेल, असे सरनाईक यांनी ठणकावले.

टक्केवारी मिळाली नाही म्हणून विरोध करता काय?

कोणतीही विकासकामे करायची झाल्यास आधी पालिकेतील सत्ताधारी भाजपला टक्केवारी द्यावी लागते. त्यामुळे आताही टक्केवारी मिळाली नाही म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या प्रस्तावाला विरोध करता का, असा खडा सवाल करत शिवसेनेचे विरोधी पक्षनेते प्रवीण पाटील यांनी भाजपवर टीकेची झोड उठवली.

आपली प्रतिक्रिया द्या