पाचोर्‍यात भाजपचा बिहारी जल्लोष, सत्ता स्थापनेनंतर भरचौकात हवेत गोळीबार

1953

भाजपचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी पार पडल्यावर 23 नोव्हेंबर रोजी जळगाव जिह्यातील पाचोर्‍यात भाजपच्या व्यापारी आघाडीच्या पदाधिकार्‍याने हवेत तीन राऊंड फायर करीत बिहारी स्टाईल जल्लोष केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या प्रकरणी पाचोरा येथील भाजपचे व्यापारी आघाडीचे जिल्हा पदाधिकारी कांतीलाल जैन यांच्याविरोधात पाचोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भाजप पदाधिकार्‍यांनी फटाक्यांची आतीषबाजी, मिठाई वाटप करून जल्लोष साजरा केला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करत असतांनाच भाजपच्या व्यापारी आघाडीचे कांतीलाल जैन यांनी हवेत तीन राऊंड फायर केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला. जिह्यातील सोशल मिडीयात याबाबतचा व्हिडीओ फिरत असूनही कुठलीही तक्रार आली नसल्याच्या कारणावरुन प्रारंभी पोलिसांनी कानावर हात ठेवले होते. 23 नोव्हेंबर रोजी भाजपचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार यांनी राजभवनात शपथ घेतली. या प्रकाराचा जिह्यातील पाचोरा येथे बिहारी स्टाईलने भाजपने जल्लोष केला. पाचोरा शहरात मिरवणूक काढून छत्रपती शिवाजी महाराज व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आले. यावेळी अमोल शिंदे, मधुकर काटे, सतीश शिंदे, मनिष भोसले, कांतीलाल जैन यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

आपली प्रतिक्रिया द्या