मुख्यमंत्री करतो, ‘आप’ सोडा; नाहीतर तुरुंगात! मनीष सिसोदिया यांना भाजपची धमकी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आम आदमी पक्ष सोडण्यासाठी आपल्यावर दबाव टाकला जात आहे. ‘आप’ सोडा, भाजपात या… दिल्लीचे मुख्यमंत्री बना, नाहीतर तुरुंगात जा, अशी धमकीच आपल्याला भाजपने दिल्याचा खळबळजनक आरोप दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी केला आहे. दरम्यान, कथित मद्य घोटाळा प्रकरण पूर्णपणे खोटा आहे. माझ्याविरुद्ध सीबीआयने फेक केस बनविली. मला अडकविण्यात आले, असेही सिसोदिया यांनी म्हटले आहे.

आज पुन्हा सिसोदिया यांची सीबीआयने तब्बल नऊ तास चौकशी केली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना सिसोदिया यांनी भाजपवर अनेक गंभीर आरोप केले. मद्य धोरणामध्ये दहा हजार कोटींचा एक्साईज घोटाळा झाल्याचा भाजप आरोप करते, परंतु सीबीआय कार्यालयात आज चौकशीदरम्यान असला कुठलाही घोटाळा झाला नाही हे स्पष्ट झाले. माझ्याविरुद्ध बनावट प्रकरण बनवून भाजपने मोठे षडयंत्र आखले आहे. भाजपला दिल्लीमध्ये ‘ऑपरेशन लोटस’ यशस्वी करायचे आहे. त्यासाठीच हे कटकारस्थान सुरू आहे, असे सिसोदिया यांनी सांगितले.

मी ‘आप’ सोडून भाजपमध्ये यावे आणि दिल्लीचे मुख्यमंत्री व्हावे नाहीतर तुरुंगात जावे लागेल, असा दबाव माझ्यावर टाकला जात आहे. ही धमकी भाजपने दिली आहे, असा आरोप त्यांनी केला.

‘आप’चे जोरदार शक्तिप्रदर्शन
उपमुख्यमंत्री सिसोदिया हे सीबीआय कार्यालयात हजर झाले. त्यांची तब्बल नऊ तास चौकशी झाली. चौकशीला हजर राहण्यापूर्वी आम आदमी पक्षाने जोरदार शक्तिप्रदर्शन केले.

गुजरातमध्ये प्रचाराला जाऊ नये म्हणून सिसोदियांना अटक होणार? – केजरीवाल
या सीबीआय चौकशीमागे भाजपचे षडयंत्र असून, आगामी गुजरात विधानसभा निवडणुकीचे कनेक्शन असल्याचा आरोप ‘आप’ने केला आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया हे सातत्याने गुजरात दौरा करत आहेत. गुजरातमध्ये ‘आप’ला चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळेच सिसोदिया यांना अटक होणार, असे सूचक ट्विट केजरीवाल यांनी केले आहे. 8 डिसेंबरला गुजरात विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होतील. तोपर्यंत हे लोक मनीष सिसोदिया यांना तुरुंगात ठेवतील. सिसोदिया गुजरातमध्ये प्रचारासाठी जाऊ नयेत, यासाठी हे प्रयत्न सुरू आहेत, असे केजरीवाल यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. सिसोदिया तुरुंगाला घाबरणार नाहीत. ‘जेल के ताले टूटेंगे, मनीष सिसोदिया छुटेंगे’ असा व्हिडीओही केजरीवाल यांनी ट्विट केला आहे.