
शेतकरी कर्ज काढतात पण ते माफ होत नाही आणि मोठय़ा उद्योगपतींचे लाखो करोडे रुपयांचे कर्ज माफ होते. शेतकरी संकटात सापडतो, त्रस्त होतो तेव्हा तो जीवन संपवण्याचा टोकाचा निर्णय घेतो. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व पंतप्रधान यांनी शेतकऱ्यांची पीडा, समस्या, दुःख ऐकून घेतले तर एकही आत्महत्या होणार नाही.
कन्याकुमारीपासून सुरू झालेली ‘भारत जोडो यात्रा’ ही कुणाला काही समजवण्यासाठी नाही तर जनतेचे दु:ख ऐकण्यासाठी असून त्यासाठीच मी येथे आलोय. पण दुसरीकडे याउलट भाजप देशात हिंसा, द्वेष, भीती पसरवण्याचे काम करत आहे, असा घणाघात कॉँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केला. शेतकरी, तरुण उघडय़ावर व मूठभर लोकच गडगंज असा हिंदुस्थान नको आणि तो आम्ही होऊ देणार नाही, असे खडेबोलही त्यांनी महाराष्ट्रातील मिंधे आणि पेंद्रातील मोदी सरकारला सुनावले. अकोला येथे राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचे तीव्र पडसाद राज्यभरात उमटल्यानंतर शेगाव येथील सभेत ते यावर काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. मात्र, राहुल गांधी यांनी सावरकरांवर बोलणे टाळत वादावर पडदा टाकला आहे.
भारत जोडो यात्रेदरम्यान शेगाव येथे काँग्रेस नेते राहुल गांधी यांची प्रचंड सभा झाली. यावेळी राहुल गांधी म्हणाले, देशातील कानाकोपऱ्यात आज भाजपने द्वेष आणि हिंसा पसरवली आहे. जनतेमध्ये भीतीचे वातावरण निर्माण केले आहे. जिथे कुठे जाल तुम्हाला भीती, द्वेष आणि हिंसेचं चित्र दिसेल. या भीती, द्वेष आणि हिंसेविरोधात आम्ही ही यात्रा सुरू केली आहे. या यात्रेचा उद्देश हा जनतेचा आवाज ऐकणे, तुमच्यातील भीती समजून घेण्याचा आहे. भीती दाखवून, हिंसा आणि द्वेष पसरवून फूट पाडली जाते. पण प्रेमाने जनतेचा आवाज ऐकल्याने लोक एकजूट होतात. द्वेषाच्या विषातून या देशाचे कधीच कल्याण होणार नाही, असा टोला त्यांनी भारत जोडो यात्रेवर प्रश्न उपस्थित करणाऱ्या विरोधकांना लगावला.
महाराष्ट्र भूमी ही साधू, संत, महापुरुषांची भूमी आहे. यांनी लोकांना प्रेम दिले, लोकांना जोडण्याचे काम केले. आम्हीही तेच करत आहोत. ज्या लोकांनी त्यांच्या आयुष्यात हिंसा अनुभवली आहे ते द्वेष पसवत नाहीत, असे राहुल गांधी म्हणाले.
छत्रपती शिवाजी महाराजांनी जगाला मार्ग दाखवला
आई मुलाला मार्ग दाखवते तसा छत्रपती शिवाजी महाराजांनी संपूर्ण जगाला मार्ग दाखवला. छत्रपती शिवराय हे केवळ एक व्यक्ती नव्हते. त्यांच्यात आणि आपल्यात एक फरक आहे. तो फरक म्हणजे ते महाराष्ट्राचा आवाज होते. महाराष्ट्र ही शिवाजी महाराजांची भूमी आहे, असे राहुल गांधी म्हणाले.
जनतेच्या मनातील सर्व भावना शिवाजी महाराजांच्या मनात होत्या. त्यांना मार्ग दाखवण्याचं काम राष्ट्रमाता जिजाऊंनी केले. शिवाजी महाराज यांना त्यांच्या आई जिजाऊ यांनी मार्ग दाखवला त्या मार्गाने ते गेले म्हणून ते छत्रपती झाले. आज आम्ही त्यांचंही स्मरण करतो. जे शिवाजी महाराज आणि महाराष्ट्रातील सर्व महापुरुषांनी म्हटले तेच काम काँग्रेसची ही ‘भारत जोडो यात्रा’ करत आहे, असे राहुल गांधी यांनी ठामपणे सांगितले.
महाराष्ट्राच्या जनतेने या यात्रेला पुरेपूर प्रेम दिलं. 3,500 किमी चालणं सोपं काम नाही. मात्र, जनतेने हे काम सोपे केले. मी माझे संपूर्ण आयुष्य हे विसरणार नाही की, महाराष्ट्राच्या जनतेने मला इतके प्रेम दिले, इतकी शक्ती दिली आणि इतके ज्ञान दिले, असेही राहुल गांधी यांनी यावेळी नमूद केले.

























































