राममंदिर निर्माणाशिवाय विजय अशक्य; सुब्रमण्यम स्वामींचा भाजपला घरचा आहेर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राममंदिर निर्माणाचा मुद्दा तापला आहे. भाजपमधील अनेक नेते सरकारकडे राम मंदिर निर्माणाची मागणी करत आहेत. आता भाजपचे खासदार आणि ज्येष्ठ नेते सुब्रमण्यम स्वामी यांनीही या मागणीला पाठिंबा दिला आहे. राममंदिर निर्माणाशिवाय आगामी लोकसभा निवडणुकीत विजय मिळणे अशक्य आहे, अशा शब्दांत त्यांनी पक्षाला इशारा दिला आहे. राममंदिर निर्माणाशिवाय लोकसभा निवडणुकांना सामोरे जाणे आत्महत्या करण्यासारखे असा घरचा आहेरही त्यांनी पक्षाला दिला आहे. त्यामुळे सरकारने याकडे गांभीर्याने लक्ष देत राममंदिर निर्माणाची प्रक्रिया सुरू करावी अशी मागणी त्यांनी केली.

सर्वोच्च न्यायालयात जमीन कोणाच्या मालकीची आहे, यावर सुनावणी होत आहे. सरकार मोबदला देऊन देशातील कोणतीही जमीन अधिग्रहीत करू शकते. सरकारने जमिनीचा मोबदला देऊन जमीन अधिग्रहीत करावी. जमिनीच्या मालकीचा निर्णय न्यायालय देईलच, त्यावर आक्षेप घेण्याचा प्रश्नच येणार नाही. ही जमीन सरकारची आहे. सरकारने बाजारभावाने मोबदला देऊन जमीन खरेदी करावी आणि राममंदिर निर्माणाला सुरुवात करावी. राममंदिर निर्माणाचे काम सुरू झाल्यावर कार्यकर्ते उत्साहाने प्रचाराच्या कामाला लागतील. त्यामुळे पक्षाला चांगला जनाधार मिळेल. राम मंगिर निर्माणाचे काम सुरू झाल्यास भाजपविरोधातील महाआघाडीला पाच जागा मिळणेही कठीण होईल अणि पक्षाला 75 जागा मिळतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मात्र, मंदिर निर्माणाशिवाय निवडणुकांना सामोरे जाणे आत्महत्या करण्यासारखे असेल. आश्वासन पूर्ण न केल्याने जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागेल, त्यामुळे सरकारने राममंदिर निर्माणची प्रक्रिया सुरू करावी, अशी मागणी त्यांनी केली.

काँग्रेसने राममंदिर निर्माणाबाबत कोणतीही भूमिका घेतली नसल्याने जनतेने त्यांना नाकारून भाजपला संधी दिली आहे. त्यामुळे भाजपने जनतेला दिलेले आश्वासन पूर्ण करावे. आश्वासन पूर्ण केले नाही तर आगामी निवडणुकीत विजय मिळवणे कठीण होईल असा इशारा त्यांनी दिला.