बीकेसीतील रस्ते वन-वे होणार; ट्रफिक जॅमवर एमएमआरडीएचा तोडगा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समधील  (बीकेसी) रस्ते लवकरच वन वे होणार आहेत. याशिवाय तेथील रस्त्यांवर पार्किंग करणाऱ्या वाहनचालकांवर कडक कारवाई केली जाणार आहे. बीकेसीतील ट्रफिक जॅमवर मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) हे तोडगे काढले आहेत. वाहनांसाठी संयुक्त पार्किंग उभारण्याचीही एमएमआरडीएची योजना आहे.

येत्या पाच-सहा महिन्यांमध्ये याची अंमलबजावणी केली जाणार असल्याची माहिती एमएमआरडीएच्या वरिष्ठ अधिकाऱयांनी दिली. बीकेसीमध्ये कन्व्हेन्शनल सेंटर, भुयारी बुलेट ट्रेन टर्मिनस, इंटरनॅशनल फायनान्शियल सेंटर आणि मेट्रो रेल्वेची दोन स्थानके उभारण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे भविष्यात बीकेसीत ट्रफिकची समस्या निर्माण होऊ शकते. हे लक्षात घेऊनच ट्रफिकवर आतापासून उपाययोजना करण्याचे एमएमआरडीएने ठरवले आहे. सुरक्षित फुटपाथ आणि साइन बोर्ड उभारणे हासुद्धा या उपाययोजनेचा भाग असणार आहे.

ट्रफिक पोलीस पेट्रोल सिस्टमही आणणार

रस्त्यांवर बेकायदा पार्किंग करणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यासाठी ट्रफिक पोलीस पेट्रोल सिस्टमही बीकेसीत राबवली जाणार आहे. त्याअंतर्गत टोइंग व्हॅन्स बीकेसीमध्ये फिरत राहतील. प्रत्येक व्हॅनमध्ये एक ट्रफिक अधिकारी, ट्रफिक पोलीस आणि एमएमआरडीएचा एक अधिकारी असेल. रस्त्यांवर पार्किंग केलेली वाहने टो करण्यात येतील.

स्मार्ट पार्किंग

बीकेसीत ‘स्मार्ट पार्किंग’ सुरू करण्याचाही एमएमआरडीएचा विचार आहे. त्यासाठी मोबाईल ऍप बनवला जाणार आहे. त्यातून वाहनचालकांना पार्किंग लॉटस्ची माहिती मिळेल तसेच किती वाहने पार्क आहेत याबाबतही समजू शकेल. पार्किंगसाठी किती जागा आहे याची माहिती देण्यासाठी रस्त्यांच्या कडेला साइन बोर्डही उभारले जाणार आहेत. सध्या बीकेसीत एमएमआरडीएच्या मालकीचे दोन बहुमजली पार्किंग लॉटस् आणि एक भुयारी पार्किंग लॉट आहे.