
एकीकडे अनिष्ट प्रथांना तिलांजली देत अनेक पुरोगामी उपक्रमांतून मानवी मूल्ये जतन करण्याचे प्रमाण वाढत असतानाच दुसरीकडे भानामती आणि करणीच्या अघोरी प्रकारांमुळे वाईटशक्ती अधूनमधून डोके वर काढताना दिसू लागत आहेत. करवीर तालुक्यातील सादळे-मादळे गावातील एकाच कुटुंबातील वडील आणि दोन मुलांची नावे लिहून लिंबू आणि काळी बाहुलीसह उतारा टाकण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
गेल्या चार-पाच दिवसांपासून मुलाने आपल्या विधवा आईचे लग्न लावून देऊन आदर्श घालून दिल्याच्या पुरोगामी घटनेने कोल्हापूरची मान उंचावली असतानाच, आज सादळे-मादळे गावात वडील आणि त्यांच्या दोन मुलांच्या नावाने काळ्या बाहुल्यांसह लिंबाचा उतारा टाकल्याची घटना समोर आली आहे. मात्र, ज्या कुटुंबाच्या नावाने हा उतारा टाकण्यात आला, त्या कुटुबांतील तरुणाने ‘त्या’ उताऱयाजवळ जाऊन अशा ‘काळ्या उद्योगां’ना घाबरत नसल्याची प्रतिक्रिया दिली. तसेच, असे करणे योग्य नाही. यातून आम्हाला आणखी ऊर्जा मिळाली असून, असल्या भोंदूबाबा आणि अंधश्रद्धेला बळी पडू नका. हा प्रकार निंदनीय असून, यातून काही साध्य होणार नसल्याचेही त्यांनी सांगितले.
काही दिवसांतील तिसरी घटना
कोल्हापूर जिह्यात अशाप्रकारचे उतारे टाकल्याची काही दिवसांतील ही तिसरी घटना आहे. नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत लिंबू, मिरच्या, बाहुल्यांना गुलाल लावून विरोधी उमेदवारांविरोधात वा निवडून येण्यासाठी उतारा टाकण्याचा प्रकार आढळून आला होता. तर गेल्या महिन्यात पाडळी खुर्द गावात मुलींना वश करण्यासाठी हळद-कुंकू, लिंबू आणि त्यावर टोचलेल्या टाचण्या, मुलींचे फोटो, हिरवे कापड असे साहित्य उताऱयात आढळून आले होते.
























































