
काही दिवसांपासून रेल्वेतील स्वच्छतेवरून वादंग उठला आहे. रेल्वेतील बेडशीट आणि ब्लँकेट महिनोन्महिने स्वच्छ केले जात नाहीत, अशी टीका होत आहे. यावर आता रेल्वेने खुलासा केला आहे. रेल्वेतील ब्लँकेट दर 15 दिवसांनी धुतले जातात. तसेच दर पंधरा दिवसांनी नेफ्थलीन वॅपोरायजेशनने निर्जंतुकीकरण केले जाते, असे रेल्वेने शनिवारी स्पष्ट केले. रेल्वेतील ब्लँकेट धुण्यासाठी लवकरच नव्या तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल. युव्ही रोबोटिक सॅनिटायजेशन असे त्याचे नाव आहे. प्रायोगिक तत्त्वावर सॅनिटायजेशन प्रक्रिया जम्मू आणि दिब्रुगढ राजधानी ट्रेनमध्ये ही प्रक्रिया सुरू केली जाणार आहे.
उत्तर रेल्वेचे प्रवक्ते हिमांशू शेखर म्हणाले, रेल्वेतील ब्लँकेट नेफ्थलीन वॅपोरायजेशनने निर्जंतुकीकरण करण्याची प्रक्रिया परिणामकारक असून ती खूप आधीपासून वापरली जातेय. कॉटन लिनन मशीन लाँड्रीमध्ये टाकून धुतले जाते. त्यांची ‘व्हिटोमीटर टेस्ट’देखील केली जाते.
हिमांशू शेखर म्हणाले, 2010 च्या आधी लोकरीचे ब्लँकेट दर दोन-तीन महिन्यांनी धुतले जायचे. त्यानंतर प्रत्येक महिन्यानंतर ते स्वच्छ केले जाऊ लागले. आता तर ही प्रक्रिया दर 15 दिवसांनी केली जाते.
दररोज सहा लाख ब्लँकेट
रेल्वेतर्फे देशभरातील प्रवाशांना प्रत्येक दिवशी सहा लाखांपेक्षा जास्त ब्लँकेट उपलब्ध करून दिले जातात. उत्तर रेल्वे झोनमध्ये एका दिवसाला एक लाखाहून अधिक ब्लँकेट आणि बेड रोल प्रवाशांना दिला जातो.
काय म्हणाली रेल्वे
आमच्याकडे साधनांची कमी असतानाही महिन्यातून कमीत कमी एकदा तरी ब्लँकेट धुतले जातात. महिन्यातून एकदा ब्लँकेटची धुलाई अपवादात्मक परिस्थितीत होत, अन्यथा असे होत नाही. दर 15 दिवसांनी ब्लँकेट स्वच्छ
होतात, असेही त्यांनी सांगितले.
























































