हवीहवीशी चाहुल!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> आसावरी जोशी

मार्च महिना… सृष्टीतील महत्त्वाच्या घडामोडी या महिन्यात घडत असतात. दोन मोठय़ा ऋतूंचा खांदेपालट याच महिन्यात होतो. सुखद थंडी काढता पाय घेत असते… आणि नकोशा उन्हाळय़ाची चाहूल मात्र सृष्टीच्या सृजनदानाने अगदी हवीहवीशी आणि सुखावणारी असते…

ऋतू म्हणजे सर्जनशीलता. सृष्टीचे सारे सर्जन आणि सृजन या दोन शब्दांभवती एकवटते. सृष्टीची प्रत्येक अभिव्यक्ती म्हणजे ऋतू. निसर्गाइतकी तरल आणि बोलकी अभिव्यक्ती दुसऱया कोणाचीही नसेल. प्रत्येक बदल, प्रत्येक हालचाल, निसर्गाचा अगदी नि:श्वाससुद्धा माणसांपर्यंत सहज पोहोचतो. फक्त हा बदल टिपण्याची किंवा निसर्गाचे गुज ऐकण्याचा कान मात्र हवा. ते समजण्याइतके तरल आणि चाणाक्ष मनही हवे. निसर्ग प्रत्येक गोष्ट त्याचा संदेश किंवा सूचना म्हणून आपल्यापर्यंत ऋतूंच्या माध्यमातून देत असतो. त्यामुळेच ऋतू हा शब्द खूपच व्यापक ठरतो. केवळ हवामानातील बदल किंवा ऊन, पाउस, थंडी या संवेदनांपुरती ऋतूची व्याख्या मर्यादित नाहीच. बदल ही संपूर्ण सृष्टीतील एकमेव स्थिर घटना आहे आणि हा बदल आपल्या ऋतुचक्राचा आत्मा आहे. सृष्टीतील प्रत्येक गोष्ट प्रत्येक वेळी फिरून पण पुन्हा नव्या स्वरूपात, नव्या रूप रंगात आपल्याकडे येते. आपल्याला भरभरून देते. प्रत्येक ऋतू या फिरून येणाऱया नव्या रूपरंगांनी सजत असतो. बहरत असतो. आपल्याला सृजनदान भरभरून देत असतो. निसर्गाचा प्रत्येक घटक या सृजनाच्या सोहळय़ात आणि देण्याच्या उत्सवात अगदी मनापासून सामील होतो. केवळ हवा, पाणी, पाउस नव्हे तर पाने, फुले, फळे, समुद्र… अगदी निसर्गाचा अविभाज्य भाग असलेले प्राणी-पक्षीसुद्धा या सोहळय़ात सामील होत असतात. खरे सांगायचे तर माणसाची भूमिका यात केवळ याचकाची, घेणाऱयाची उरते.

आपण आपल्या सृष्टीआईला काय देतो किंवा निसर्गबांधवांना काय देतो हा माणसाच्या बाबतीत एक खरोखर न सुटणारा, अवघड प्रश्न आहे आणि चर्चेसाठीही खूपच वेगळा व गहन विषय आहे. पण सृष्टीचे सृजनदान मात्र आपल्यापर्यंत नित्यनेमाने पोहोचत असते, पोहोचविले जात असते. निसर्गाची एवढीशी चिमूटभर मातीही वैशिष्टय़पूर्ण आहे. तिच्या रंगात, रूपात अनेक गुणधर्म, औषधोपचार अगदी पुरेपूर भरलेले आहेत.

सध्या मार्च महिना सुरू आहे. वाचकांच्या मनात नक्कीच प्रश्न उभा राहील की, मार्चचे असे मोठेसे काय? महिन्यासारखा महिना, फक्त आर्थिक वर्ष संपविण्याची, कर भरण्याची धांदल… अगदी जास्तीजास्त विद्यार्थ्यांच्या विविध परीक्षांचे दिवस यापलीकडे काय…? सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे निसर्गाची भाषा समजण्यासाठी थोडेसे मन उघडे ठेवले तर बऱयाच गोष्टी उमजतात, आकळतात.

हा इंग्रजी मार्च महिना आणि आपला फाल्गुन-चैत्र महिना. दोन मोठय़ा ऐसपैस ऋतूंचा खांदेपालट होत असतो. थंडी काढता पाय घेत असते. उन्हाचे गाव हळूहळू जवळ येत असते. सुखद थंडी जाणार याचे दुःख असतेच. नाइलाजाने उन्हाळय़ाच्या तयारीला लागायचे असते. सुती कपडे, नव्या माठाची खरेदी, पंखा, एसी आणि बरेच काही…

या नकोशा वाटणाऱया काहिलीची चाहूल मात्र फार फार सुखावणारी असते; कारण निसर्गातील अनेक सृजनाच्या गोष्टी ही चाहूल आणत असते कडक उन्हाचा ताप कमी व्हावा म्हणूनच निसर्गाची ही रचना असेल.

सुरंगीचे वळेसर – मुंबई-पुण्यासारख्या मोठय़ा शहरातील लोकांनी मार्च महिन्यात आपल्या आसपासच्या फुलवाल्यांवर जरा बारीक लक्ष ठेवावे. अर्थात त्यांच्या टोपलीतील फुलांवर. या महिन्यात जेमतेम पंधरा दिवस दिसणारे अत्यंत सुगंधी सुरंगीचे वळेसर त्यांच्या सुगंधी पावलांनी अख्खा उन्हाळा सुगंधी आणि शीतल करून जातात. सिंधुदुर्ग, सावंतवाडी, गोवा येथे सहज मिळणारी सुरंगी आपल्या शहरात अगदी पंधरा दिवसांची पाहुणी. तळकोकणातील रानावनात सुरंगीचे डेरेदार वृक्ष आढळतात.. त्यांच्या भल्यामोठय़ा फांद्यांना ही नाजुकशी फुले लगडलेली असतात. खूपच प्रयासाने ही फुले वळेसरासाठी मिळविता येतात. ही फुले इतकी नाजूक असतात की, ती उमलल्यावर खुडता येतच नाहीत. त्यामुळे त्यांच्या कळय़ा काढण्यासाठी घरोघरच्या मुली भल्या पहाटेच या विशाल वृक्षावर चढतात. झाडावर चढूनच ही नाजुकशी फुले काढता येतात आणि घरी आणून त्या कळय़ांचेच गजरे करावे लागतात. कारण या कळय़ा एकदा उमलल्या की त्यांना जास्त हाताळता येत नाही. हे वृक्ष रानातच उगवतात. त्यांची लागवड होत नाही. 70-80 वर्षांचे हे झाड कोकणातील किमान दोन पिढय़ांना आपला सुगंध देत राहते.

अबोली – हिच्या नावावरूनच हिच्या रंगाची ओळख आहे. अबोल असणे हीच तिची ओळख. सुगंध तिला ठाऊकच नाही. हेच दिवस हिच्याही आगमनाचे. एवढी नाजुकशी ही पण बाईपणाची जिद्द आणि चिवटपणा नेहमीच दाखवत असते… अबोलपणे. 3-4 दिवस सहज टिकतात ही फुले. आता बाराही महिने दिसत असली तरी तिच्या खुलण्याचे खरे दिवस हेच… मार्च महिन्यातले.

ताडगोळे – मऊशार… स्फटिकासारखे दिसणारे ताडगोळे. ही फळेही अगदी पहाटेच ताडीच्या झाडावरून काढावी लागतात. यातूनच निरा मिळते. तसे ताडगोळे पूर्ण उन्हाळय़ात मिळतात; पण या दिवसात त्यांचे होणारे आगमन खूपच सुखावणारे असते. अगदी कोवळा ताडगोळा. हलक्या हाताने सोलून अलगद तोंडात टाकायचा. खोबऱयागत विरघळतो. ज्यांना वजन कमी करायचे आहे त्यांनी आवर्जून खावा. यकृताच्या दुखण्यावरही गुणकारी.

कच्चा फणस – काटेरी, पण लाघवी फणस जूनपर्यंत लांबतो. अगदी वट पुनव दिमाखात साजरी करतो. पण या महिन्यात येणाऱया छोटय़ा, बुटक्या कच्च्या फणसाची मौज काही न्यारीच. हातात मावणारे छोटेसे हिरवेगार फणस. हाताला तेल लावूनच चिरायचे. उकडून भरपूर तेलाच्या फोडणीत जोडीला वाल घालून फर्मास भाजी तय्यार.

कैरी – तिची कंच चाहूल… डोळे आणि जिव्हा दोन्हींना सुख देणारी. या कैऱयांचे किती पदार्थ करावेत. ताजे लोणचे, कैरीची आमटी, कैरीचे सार, तुरीच्या डाळीची कैरी घालून आमटी, आंबे डाळ, पन्हे काय आणि किती…

काजू फळे – लालसर रंग.. अगदी पिवळासुद्धा. संपूर्ण उन्हाळा काढत नाहीच ही फळे. जेमतेम मार्च आणि एप्रिल. खाताना तोंडही चिकाने माखून जाणार. पण खाण्याची मौज काही न्यारीच. थोडी तूरट, थोडी गोड. जणू जगण्याचे सार सहज शिकवणारी.

ही मार्चमधील यादी पुढे खूपच लांबत जाते. अनेक मानाची नावे यात येतात.. मोगरा.. आंबा.. इ. इ.. पण या छोटय़ा छोटय़ा गोष्टींच्या सृजनदानाने मार्च महिना खऱया अर्थाने सोनेरी आणि देखणा होऊन जातो.

[email protected]