लक्षणे, सहव्याधी नसलेल्या रुग्णांना कोविड बेड देऊ नका! बेड कमी पडू नयेत म्हणून पालिकेचा निर्णय

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लक्षणे आणि सहव्याधी नसलेल्या रुग्णांना कोरोनाचा धोका नसल्याने त्यांना कोविड बेड देऊ नका असे निर्देश पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी दिले आहेत. लक्षणे, सहव्याधी असलेल्या गरजू रुग्णांना बेड कमी पडून नयेत यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले आहे. पॉझिटिव्ह रुग्णांना ‘वॉर्ड वॉररूम’च्या समन्वयातूनच बेड उपलब्ध करून द्यावेत आणि लक्षणे नसलेल्या रुग्णांना डिस्चार्ज द्यावा आणि त्यांना आवश्यक त्या ठिकाणी क्वारंटाइन करावे, असेही आयुक्तांनी स्पष्ट केले आहे.

कोरोनाच्या दुसऱया लाटेमुळे रुग्ण वेगाने वाढत असल्यामुळे प्रत्येक कोविड सेंटर आणि खासगी रुग्णालयांनी सर्व बेड सुविधांसह तैनात ठेवावेत असे आदेश आयुक्तांनी परिपत्रकाद्वारे दिले आहेत. शिवाय रुग्णालयांतील ऑक्सिजन साठा, व्हेंटिलेटर आणि इतर आवश्यक साधनसामग्री तैनात ठेवावे असेही आयुक्तांनी परिपत्रकात म्हटले आहे. सर्व खासगी रुग्णालयांनी 80 टक्के बेड कोविड रुग्णांसाठी आणि 100 टक्के आयसीयू बेड कोविड रुग्णांसाठी उपलब्ध ठेवण्याच्या सूचनाही आयुक्तांनी दिल्या आहेत. भांडुप आग दुर्घटनेत 11 रुग्णांचा बळी गेला असल्यामुळे आता पालिकेची सर्व रुग्णालये, कोविड केंअर सेंटर्सचे स्ट्रक्चरल आणि फायर ऑडिट करून घेण्याचे निर्देशही आयुक्तांनी दिले आहेत.