
सामना प्रतिनिधी । मुंबई
धो धो पावसात रस्त्यावर पाणी साचायला लागलं की मुंबईकर आधी घरचा रस्ता धरतात. पण पालिकेचे कर्मचारी याच पाण्यात उतरतात आणि पाणी ओसरेपर्यंत याच पाण्यात उभे राहून मॅनहोलच्या जाळय़ांवरचा कचरा हाताने बाजूने करून पाण्यासाठी वाट मोकळी करून देतात. गेल्या दोन आठवडय़ांत हिंदमाता परिसरात साचलेल्या पाण्यात ज्यांनी मुंबईकरांसाठी सेवा दिली अशा कर्मचाऱयांचा नुकताच एफ दक्षिण कार्यालयात सत्कार केला तेव्हा हे कर्मचारी भारावून गेले होते.
‘पाणी साचायला लागले की पालिकेचे कर्मचारी काही काम करत नाही’ अशा अर्थाच्या पोस्ट सोशल मीडियावर टाकल्या की मुंबईकरांची जबाबदारी संपते, पण मुंबईकरांना कोणताही त्रास होऊ नये म्हणून पालिकेचे कर्मचारी भरपावसात रात्री- अपरात्रीही रस्त्यावर उतरून कामे करत असतात. त्यातही मलनिस्सारण विभागातील कर्मचारी ज्या प्रकारचे काम करतात त्याची मुंबईकरांना घरात बसून कधीही कल्पना येणार नाही. या कर्मचाऱयांच्या कामाची दखल घेऊन एफ दक्षिण विभागाचे सहाय्यक आयुक्त किशोर देसाई यांनी १६ कर्मचाऱयांचा गौरव केला. माजी महापौर श्रद्धा जाधव यांच्या हस्ते हा सत्कार सोहळा पार पडल्यानंतर सगळे कर्मचारी अक्षरशः भारावून गेले होते. यावेळी प्रभाग समिती अध्यक्ष सचिन पडवळ, नगरसेवक दत्ता पोंगडे, नगरसेविका स्मिता गावकर, सब इंजिनीयर संजय मोहिते आणि कर्मचारी, अधिकारी उपस्थित होते.
एफ दक्षिण कार्यालयातील मलनिस्सारण विभागातील ड्रेनेज असिस्टंट, दोन मुकादम आणि १२ कामगार यांचा मंगळवारी सत्कार करण्यात आला. यापैकी सर्व कामगार हे कर्जत, डोंबिवली, नालासोपारा, विरार असे मुंबईबाहेर राहणारे आहेत.
लेप्टोच्या गोळय़ा
एफ साऊथ विभागातील आरोग्य विभागाने या कर्मचाऱयांसाठी नुकतेच वैद्यकीय शिबीरही आयोजित केले होते. तर पाण्यात जाण्यापूर्वी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून या सर्वच कर्मचाऱयांना लेप्टोवरील औषधाच्या गोळय़ा दिल्या जातात.
पाणी नक्कीच कमी होते
मी गेली ३४ वर्षे पालिकेत नोकरी करतोय. हिंदमाता परिसरात पूर्वी जितके पाणी साचायचे त्यापेक्षा आता नक्कीच खूप वेळाने पाणी साचते आणि खूप लवकर निचरा होतो असा माझा अनुभव आहे. – हरी नाईक, मुकादम
अशा वेळी वाईट वाटतं!
‘पालिकेचे कर्मचारी काहीच करीत नाहीत’ असे जेव्हा टीव्हीवर ऐकतो, मुंबईकर असे बोलतात तेव्हा अतिशय वाईट वाटते. – उमेश माने
विरारला घरात पाणी आणि मी हिंदमातामध्ये
मी विरारला राहतो. हिंदमाताजवळ पाण्यात उभे राहून डय़ुटी करत होतो तेव्हा माझ्या विरारच्या घरात पाणी भरल्याचा फोन घरून आला होता. पण मी काहीच करू शकलो नाही. घरच्यांना काळजी घ्या एवढेच सांगून सलग तीन दिवस इथेच डय़ुटी केली. – वीरेंद्र गावडे
प्लॅस्टिकचाच कचरा
मॅनहोलवर सतत कचरा साठत असतो. दोन फूट पाण्यातही वाकून हा कचरा आम्हाला बाजूला करावा लागतो. त्यात बहुतेकवेळा प्लॅस्टिकच असते. झाडांची पाने, कागद अशा कचऱ्यांपेक्षाही प्लॅस्टिकमुळे पाणी जास्त तुंबते. प्लॅस्टिकबंदी झालीच पाहिजे. – संदीप चौगुले




























































