
मुंबईत कोरोना वेगाने वाढत असताना रुग्णांची गैरसोय टाळण्यासाठी औषधे, आयसीयू, व्हेंटिलेटर खरेदीत कोणतीही हयगय न करता आवश्यक साधनांची खरेदी करावी असे निर्देश स्थायी समितीने पालिकेच्या मध्यवर्ती खरेदी प्राधिकरणाला दिले आहेत. मुंबईत सद्यस्थितीत केवळ 51 आयसीयू आणि 15 व्हेंटिलेटर शिल्लक आहेत. त्यामुळे आवश्यक आरोग्य साधनांची खरेदी करण्याचे आदेश दिल्याची माहिती स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी दिली.
मुंबईत कोरोना रुणसंख्या वेगाने वाढत असताना सद्यस्थितीत सक्रिय रुग्णांची संख्या 83 हजार 934 वर पोहोचली आहे. यामध्ये अत्यवस्थ रुग्णांची संख्या 1405 झाली आहे. असे असताना 824 ऑक्सिजन बेड शिल्लक असले तरी आवश्यक उपाययोजना तातडीने खरेदी करून उपलब्ध कराव्यात असे निर्देश स्थायी समितीने दिले आहेत. यावेळी सभागृह नेत्या विशाखा राऊत, विरोधी पक्षनेते रवी राजा, राष्ट्रवादीच्या गटनेत्या राखी जाधव यांनी पालिकेने उपलब्ध आरोग्य सुविधांची माहिती द्यावी अशी मागणी केली. रुग्णांची गैरसोय टाळण्यासाठी आवश्यक सुविधांची खरेदी करावी आणि या खर्चाला स्थायी समितीची कार्योत्तर मंजुरीनंतर घ्यावी असेही स्थायी समितीकडून स्पष्ट करण्यात आले. मात्र अनावश्यक खरेदी करू नये आणि नियमानुसार खरेदी करावी, असेही स्थायी समितीकडून निर्देश देण्यात आले.
रिचर्डसन क्रुडासमध्ये जादा बेड कार्यान्वित करा
पालिकेच्या भायखळा येथील रिचर्डसन क्रुडास जम्बो कोविड सेंटरची क्षमात दीड हजारापर्यंत आहे. मात्र सद्यस्थितीत या ठिकाणी केवळ 300 बेड कार्यान्वित असल्याची माहितीही स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी दिली. त्यामुळे या ठिकाणी जादा बेड तातडीने कार्यान्वित करावेत असे निर्देशही यावेळी प्रशासनाला देण्यात आले. तसेच भायखळ्यातील डोळ्यांच्या रुग्णालयातील 30 ऑक्सिजन बेड तातडीने सुरू करावेत असेही सांगण्यात आले. यानुसार प्रशासनाने कार्यवाही सुरू केली आहे.






























































