वेळ-पैशांची बचत, रस्ताही मजबूत, चार दिवसांत सिमेंट काँक्रीट रस्ता तयार

मुंबईत आता रस्ता तयार करण्यासाठी वेळ आणि पैशांची बचत करणारे ‘प्रिकास्ट प्रिस्ट्रेस काँक्रीट पॅनेल’ तंत्रज्ञान वापरून सिमेंट काँक्रीटचे रस्ते बनवणार आहे. यामध्ये सिमेंट काँक्रीट तयार करून रस्ते न बनवता कास्टिंग यार्डमधून तयार पॅनेल आणून ते रस्त्यावर बसवण्यात येणार आहेत. यामुळे सिंमेंट काँक्रीटचा रस्ता तयार करण्यासाठी सुमारे एक महिन्याचा वेळ अवघ्या चार ते पाच दिवसांवर येणार आहे.

‘मिंधे’ सरकारने पालिकेच्या कारभारात हस्तक्षेप करीत शहरातील सर्व रस्ते एकाच वेळी सिमेंट काँक्रीटचे करण्याचा घाट घातल्यामुळे पंत्राटदार प्रतिसाद देत नसल्याने गेल्या सवा वर्षांत तिसऱयांदा निविदा मागवण्याची वेळ आली आहे. या दिरंगाईमुळे मुंबई शहरातील रस्ते खड्डय़ात गेले आहेत. यातच पावसाळा तोंडावर आल्यामुळे रस्त्याची ही कामे आता ऑक्टोबरनंतरच होण्याची शक्यता आहे. मुंबईतील रस्ते सिमेंट क्राँक्रीटचे करण्यासाठी सहा हजार कोटींचे पंत्राट देण्यात आले आहे, तर मुंबईत 397 किमी अंतरात 910 रस्त्यांच्या कामांपैकी आतापर्यंत 123 कामे सुरू झाली असून उर्वरित 787 कामांना अद्याप सुरुवात झालेली नाही. यातील फक्त 11 कामे पूर्ण झाली असून 4 प्रगतीपथावर आहेत.

असे वापरणार तंत्रज्ञान

प्रिकास्ट प्रिस्ट्रेस काँक्रीट पॅनेल तंत्रज्ञानात रस्त्याचा पृष्ठभाग भरणी आणि खडी, रोड रोलरच्या सहाय्याने समतल करण्यात येतील. रस्त्यावर येणारे पाणी स्ट्रॉम वॉटर ड्रेनमध्ये जाण्यासाठी उताराची व्यवस्था करण्यात येईल. यानंतर कास्टिंग यार्डमध्ये तयार केलेली मजबूत पॅनेल रस्त्यावर बसवण्यात येतील. यांची जाडी सुमारे चार ते सहा इंचांपर्यंत असेल. हे पॅनेल प्रिस्ट्रेट हायड्रोलिक वायरने मजबूतरीत्या जोडण्यात येतील.

असा होणार फायदा

– मुंबईत तयार करण्यात येणाऱया रस्त्यांसाठीचे सिमेंट काँक्रीट नवी मुंबई किंवा ठाण्यावरून आणले जाते. रस्त्यावर काँक्रीट ओतल्यानंतर 14 दिवस पाणी मारणे, चिरा जोडणे, काँक्रीट सुकवणे, अतिरिक्त लागलेले काँक्रीट हटवण्यासाठी खूप वेळ वाया जातो.

– शिवाय रस्त्यावर काँक्रीट तयार केल्यास आवाज आणि हवा आणि ध्वनिप्रदूषणाचा त्रास होतो. अनेक दिवस चालणाऱया कामामुळे स्थानिक रहिवासी तक्रारीही करतात, मात्र नव्या तंत्रज्ञानामुळे वेळ, खर्च, प्रदूषण होणार नाही. शिवाय रस्तेही वेगाने तयार होणार आहे.