पालिकेच्या ‘कोरोना’ लढय़ातील 182 हॉटेल्सचा मालमत्ता कर माफ, एप्रिल ते जूनच्या आकारातून सुटका

पालिकेच्या कोरोना लढय़ात सहकार्य करणाऱया 182 हॉटेल्सचा मालमत्ता कर माफ करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. यामध्ये संबंधित हॉटेल्सनी एप्रिल ते जून या कालावधीत आपली सेवा पालिकेच्या माध्यमातून रुग्ण आणि कर्मचाऱयांना दिल्यामुळे या कालावधीतील मालमत्ता कर माफ करण्यात येणार आहे. ‘वेलनेस पॅकेज’ म्हणजेच ‘कृतज्ञता निधी’ अंतर्गत हॉटेल्सना ही सवलत दिली जाणार आहे.

मुंबईत मार्चमध्ये कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर काही दिवसांतच मोठय़ा संख्येने रुग्णवाढ होऊ लागली. या आपत्कालीन स्थितीमध्ये पालिकेच्या माध्यमातून अनेक हॉटेल्सना पालिकेला सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले. याला 182 हॉटेल्सनी उत्स्फूर्त प्रतिसाद सामाजिक भान ठेवून आपल्या सुविधा उपलब्ध करून दिल्या.

यामध्ये क्वारेंटाइन सेंटरसाठी रूम उपलब्ध करून देण्यात आले. कोरोनाचा प्रभाव अत्युच्च पातळीवर गेलेला असताना आणि लॉकडाऊन असताना गरजू, विस्थापितांची उपासमार होऊ नये यासाठी पालिकेच्या माध्यमातून अन्न आणि निवाऱयाची व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली.

या काळात पालिका कर्मचाऱयांच्या निवासाची व्यवस्था कोविड सुविधांच्या नजिकच्या हॉटेल्समध्ये करण्यात आली. यामध्ये पालिकेला सहकार्य करणाऱया हॉटेल्सनी अगदी तुटपुंज्या दरात कोविड सेंटर आणि पालिका कर्मचाऱयांच्या निवासाची व्यवस्था उपलब्ध करून दिली.

या काळात लॉकडाऊन असल्याने संबंधित हॉटेल्सच्या अर्थव्यवस्थेवरही परिणाम झाला आहे. त्यामुळे संबंधित हॉटेल्स व्यावसायिकांनी केलेल्या विनंतीनुसार एप्रिल ते जून या कालावधीतील मालमत्ता कर माफ करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे.

अर्थसंकल्पीय तरतुदीतून ‘वेलनेस पॅकेज’

संबंधित हॉटेल्सच्या 2019-20च्या आर्थिक वर्षासाठीची करदेयता सुमारे 75.48 कोटी आहे. यात पंचवार्षिक सुधारणाअंतर्गत 20 टक्के वाढही अपेक्षित आहे.

त्यामुळे एप्रिल ते जून 2020 या कालावधीत सुमारे 22.70 कोटी कर माफ करावा लागणार आहे. या योजनेस ‘वेलनेस पॅकेज’ असे संबोधण्यात येईल. ही रक्कम आरोग्य खात्यातील अर्थसंकल्पीय तरतुदीतून ‘वेलनेस पॅकेज’ अंतर्गत वळती करण्यात येणार आहे. याबाबतचा प्रस्ताव आगामी स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरीसाठी मांडला जाणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या