राजस्थानात चंबळ नदीत नाव उलटली; 20 जणांना वाचवण्यात यश, 10 जण बेपत्ता

प्रातिनिधिक फोटो

राजस्थानातील बूंदीजवळील चंबळ नदीत नाव उलटल्याची घटना घडली आहे. नाव उलटल्याने त्यातील 30 प्रवासी नदीत पडले. त्यापेकी 20 जणांना वाचवण्यात यश आले असून 10 जण बेपत्ता आहेत. कमलेश्वर धामला जाण्यासाठी प्रवासी नावेत बसून नदी पार करत होते. नावेत क्षमतेपेक्षा जास्त वजन असल्याने नाव उलटल्याची माहिती मिळाली आहे.

कमलेश्वर धामला जाण्यासाठी 30 प्रवासी नावेत बसले होते. तसेच नावेत 14 दुचाकीही ठेवण्यात आल्या होत्या. क्षमतेपेक्षा जास्त वजन झाल्याने नाव उलटल्याचे सांगण्यात आले. दुर्घटनेची माहिती मिळताच आसपासच्या परिसरातील नागरिक बचाव कार्यासाठी आले. त्यांनी बुडणाऱ्या प्रवाशांना वाचवले. नदीतून 20 प्रवाशांना सुखरुप बाहेर काढण्यात यश आले आहे. तर 10 जण बेपत्ता आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि प्रशासनाचे अधिकारीही घटनास्थळी दाखल झाले आहेत. बेपत्ता प्रवाशांचा शोध घेण्यात येत आहे. बेपत्ता प्रवाशांच्या शोधासाठी आणि बचावकार्यासाठी कोटाहून एसडीआरएफचे पथक घटनास्थळी पाठवण्यात आले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या