मुंबई-गोवा महामार्गावर बनावट दारूसह 16 लाखांचा मुद्देमाल जप्त, कणकवली पोलिसांची कारवाई

मुंबई-गोवा महामार्गावर गोव्याहून मुंबईच्या दिशेने आयशर टेम्पोमधून अनाधिकृत दारु वाहतूक होत असल्याची माहिती कणकवली पोलिसांना मिळाली. त्यानुसार सापळा रचत महामार्गावरील ओसरगाव येथील टोलनाक्यानजीक मध्यरात्रीच्या सुमारास पोलिसांनी दारूची वाहतूक करणार टेम्पो पकडला. या कारवाईत जवळपास 9 लाख रुपये किंमतीची दारू जप्त करण्यात आला.

आयशर टेम्पो (जीजे 06, एक्स 7898) पोलिसांनी थांबवला. मात्र चालक व क्लिनर टेम्पोमधून उतरून अंधाराचा फायदा घेऊन पळाले. पोलिसांनी टेम्पोची तपासणी केली असता यात दारूच्या बाटल्यांचे बॉक्स आढळून आले. पोलिसांनी एकूण 8 लाख 89 हजार 200 रुपयांच्या दारूच्या बाटल्या, तसेच ७ लाख रुपयांचा आयशर टेम्पो असा एकूण 16 लाखांचा मुद्देमाल जप्त केला.

ही कारवाई सहाय्यक निरीक्षक बापू खरात, शिवाजी सावंत, राजेश उबाळे, कॉन्स्टेबल रुपेश गुरव, नितीन बनसोडे, होमगार्ड पवार यांनी केली. फिर्याद कॉन्स्टेबल नितीन बनसोडे यांनी दिली. त्यानुसार अनोळखी संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या