‘बोगस खासगी लसीकरण’ प्रकरण; पासवर्ड, युजर आयडी चोरून बनावट लसीकरण प्रमाणपत्रे दिली, पालिकेच्या चौकशी अहवालात ठपका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कांदिवलीत उघडकीस आलेल्या ‘बोगस खासगी लसीकरण’ प्रकरणात प्रमाणपत्र देण्यासाठी आरोपींनी काही केंद्रांचा पासवर्ड, युजर आयडी चोरून वापरल्याचा ठपका चौकशी अहवालात ठेवण्यात आला आहे. या लसीकरणासाठी पालिकेची कोणतीही परवानगी घेण्यात आली नव्हती. शिवाय लसींचा साठाही बेकायदेशीररीत्या मिळवल्याचेही अहवालात नमूद करण्यात आले आहे. परिमंडळ-7 चे उपायुक्त विश्वास शंकरवार यांनी हा चौकशी अहवाल पालिका प्रशासनाकडे सादर केला.

कांदिवली येथील हिरानंदानी हेरिटेज क्लब गृहसंकुलात 30 मे रोजी 390 जणांचे बोगस लसीकरण झाल्याचे उघड झाले आहे. या बोगस लसीकरणाची चौकशी करून 48 तासांत अहवाल सादर करण्याचे निर्देश अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी उपायुक्त विश्वास शंकरवार यांना दिले होते. यानुसार शुक्रवारी रात्री उशिरा हा अहवाल शंकरवार यांनी पालिका प्रशासनाला सादर केला. यानुसार लसीकरण झालेल्या व्यक्तींना पालिकेच्या जम्बो कोविड केंद्रासह दोन खासगी रुग्णालयांची प्रमाणपत्र मिळाली होती, मात्र पालिकेच्या चौकशीत या रुग्णालयांचा लसीकरणाशी कोणताही संबंध नसल्याचे आढळले आहे. संबंधित लसीकरण केंद्रांशी कोणताही करार झालेला नाही. त्यामुळे लसीकरणाचे प्रमाणपत्र देण्यासाठी युजर आयडी आणि पासवर्ड चोरून बनावट प्रमाणपत्र दिल्याचा ठपका या समितीने ठेवला आहे. खासगी संकुलात लसीकरण करण्यापूर्वी महानगरपालिकेने तयार केलेल्या मसुद्यानुसार संबंधित लसीकरण केंद्र आणि संकुलामध्ये करार होणे अनिवार्य आहे. तसेच खासगीरीत्या होणाऱया लसीकरणाची माहिती पालिकेच्या स्थानिक प्रभागातील आरोग्य विभागाला कळवणे बंधनकारक आहे. मात्र या लसीकरणासाठी अशी परवानगी घेण्यात आली नव्हती.