भीमा कोरेगांव हिंसाचार प्रकरण – आनंद तेलतुंबडेंना जामीन मंजूर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

भीमा कोरेगांव हिंसाचार प्रकरणी अटक करण्यात आलेल्या आनंद तेलतुंबडे यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने शुक्रवारी त्यांचा जामीन मंजूर केला. तेलतुंबडे यांना 2020 पासूल तळोजा तुरुंगात ठेवण्यात आले आहे. मुंबई उच्च न्यायलयाचे न्यायमूर्ती ए.एस.गडकरी आणि न्यायमूर्ती मिलिंद जाधव यांच्या खंडपीठापुढे तेलतुंबडे यांच्या जामिनावर विस्ताराने युक्तिवाद झाले होते. दोन्ही बाजूचे युक्तिवाद ऐकल्यानंतर या खंडपीठाने आज जामिनाबाबतच्या याचिकेवर आदेश दिला. राष्ट्रीय तपास यंत्रणा म्हणजेच एनआयए ने तेलतुंबडे यांच्या जामिनाला विरोध केला होता. ज्याविरोधात तेलतुंबडे यांनी उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर तेलतुंबडे हे तपास यंत्रणांपुढे हजर झाले होते. त्यांना 14 एप्रिल 2020 रोजी अटक करण्यात आली होती.

प्राथमिक दृष्ट्या तेलतुंबडे यांच्याविरोधात बेकायदेशीर कृत्यांमध्ये सहभाग (कलम 13), दहशतवादी कृत्ये (कलम 16) आणि कट रचणे (कलम 18) यासाठीचा अपराथ सिद्ध होताना दिसत नसल्याचं उच्च न्यायालयाचं म्हणणं आहे. तेलतुंबडे यांच्याविरोधात फक्त दहशतवादी संघटनेचे सदस्यत्व आणि समर्थन (कलम 38 आणि कलम 39) यासाठी असलेले आरोप खरे असावेत असं आतापर्यंतच्या युक्तिवादावरून वाटत असून या कलमांअंतर्गत जास्तीत जास्त 10 वर्षे शिक्षा होऊ शकते. तेलतुंबडे यांनी 2 वर्षे आधीच तुरुंगात घालवली आहेत. ही परिस्थिती पाहाता आम्ही तेलतुंबडे यांना जामीन देत आहोत असे न्यायालयाने म्हटले आहे.