अंतर्मनातल्या द्वंद्वाचा कोलाज- ‘काळेकरडे स्ट्रोक्स

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> हर्षद सहस्रबुद्धे

प्रणव सखदेवची पहिली कादंबरी ‘काळेकरडे स्ट्रोक्स’ वाचायची उत्सुकता तिची घोषणा झाली तेव्हापासूनच होती. ‘निळय़ा दाताची दंतकथा’ आणि ‘नाभीतून उगवलेल्या वृक्षाचं रहस्य’ या दोन कथासंग्रहांमध्ये कथा या फॉर्मशी आकर्षक प्रयोग करून झाल्यानंतर प्रणव कादंबरी हा महत्त्वाचा फॉर्म कसा हाताळतो याबाबत एक वाचक म्हणून मला कुतूहल होतं. ‘काळेकरडे स्ट्रोक्स’ ही तिच्या नावाप्रमाणेच आहे. काळी आणि करडी. तिच्या कथानकात पांढरा रंग हा नावाला आहे. कादंबरीची सुरुवात होते ती रुईया या मुंबईच्या प्रसिद्ध महाविद्यालयाच्या पार्श्वभूमीवर. नायक समीर रुईयाच्या परिसरात उभा राहून सभोवताल न्याहाळतोय आणि जुने दिवस आठवतेय हा या कादंबरीचा ओपनिंग सीन. या जुन्या आठवणीत रमून समीर त्याचे कॉलेजचे दिवस आठवतो. डोंबिवली, मुळशी, मनाली या ठिकाणी व्यतीत केलेले प्रसंग आठवत जातो, मित्रमैत्रिणींच्या आठवणीत रेंगाळतो. काळानुसार बदलत गेलेल्या स्वतःला, मित्रमैत्रिणींना आणि परिस्थितीला त्रयस्थाच्या नजरेने पाहतो. ही कादंबरी मोठय़ा स्पॅनमध्ये घडते. साधारण दहा-पंधरा वर्षांच्या काळात घडलेल्या स्थित्यंतरांचं दर्शन घडवते. यातली पात्रे तुमच्या आमच्यासारखी मध्यमवर्गीय घरातली आहेत, पण त्यांचं जग मात्र आपल्यासारखं नाही. ते वरवर दिसायला जरी नॉर्मल असलं तरी त्याला अनेक गडद पदर आहेत. समीर, सानिका, चैतन्य, सलोनी, अरुण अशी साधारण एकाच वयाची मुख्य पात्रे या कादंबरीत आहेत. ही पात्रे, त्यांची आपापसातली नाती आणि काळानुसार त्यांचं बदलत जाणं असं या कादंबरीचं वन लाइन कथासूत्र होईल. समीर या नायकाच्या तोंडून प्रथम पुरुषात ही कथा सांगितली जाते. यामुळे याची कथा रोजच्या परिचित परिघातली वाटते.

ही कादंबरी वाचताना सोडवत नाही. सुरुवातीपासून शेवटपर्यंत खिळवून ठेवण्याची क्षमता त्याच्या कथानकात नक्कीच आहे. सुरुवातीची शंभरएक पाने बऱयापैकी लाईट मूड असलेली आहेत. प्रणव यामध्ये प्रामुख्याने वातावरणनिर्मिती करतो, नवनवी पात्रे आणत जातो. त्यांची नाती आणि परस्परसंबंध उलगडत जातो. कॉलेज लाईफमधल्या गमतीजमती, जरासा जुना काळ, त्या काळानुसार असणाऱया गोष्टी, इराणी हॉटेल्स, जुनी मुंबई, गेम पार्लर्स, पात्रांची घरे, खोल्या इत्यादी स्थळांचा परिचय करून देतो. समीर हा नायक, चैतन्य हा त्याचा अंध मित्र, मैत्रिणी सानिका, सलोनी आणि कथानकात अचानकपणे एण्ट्री घेणारा अरुण अशी सगळी पात्रे एकाआड एक सामोरी येत जातात आणि वाचक कथानकात हरवत जातो. साधारण मध्यावर म्हणजे शंभर, एकशेदहाव्या पानापासून कादंबरी निरनिराळी अपरिचित वळणे घेऊ लागते. मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेल्या मुलांचं काळंकरडं जग दाखवायला सुरुवात करते आणि एकामागून एक हादरे द्यायला लागते. कॉलेज जीवनातली संवेदनशील असलेली मनं काळानुसार कशी निबर होत जातात, त्यातली काही अतिसंवेदनशील मने एखाद्या प्रसंगाने कशी कायमसाठी तुटतात आणि काही अकाली प्रौढ असणारी मने कशी अधिकाधिक प्रौढ आणि पोक्त होत जातात याचं चित्रण या कादंबरीतून वाचायला मिळतं.

हलक्या नोटवर सुरू झालेलं हे कथानक साधारण मध्यानंतर असंख्य परिचित वळणे घेतं आणि एका वेगळय़ा, गडद नोटवर येऊन थांबतं. सानिकाची तिच्या मित्राशी खूप खोलवर असलेली अटॅचमेंट, अरुणचं अतिशय प्रॅक्टिकल असणं, सलोनीचं वरवर पाहता कणखर, प्रॅक्टिकल आणि कूल भासणारं, पण अंतर्मनात द्वंद्व जोपासणारं हळवं व्यक्तिमत्त्व, चैतन्यचं अंध डोळसपण, समीरचं ‘गो विथ द फ्लो’ व्यक्तिमत्त्व हे सगळं मिळून ‘काळेकरडे स्ट्रोक्स’चा माहोल तयार होतो. टिपिकल, कॉलेज लाईफ असणारी ही कादंबरी नाही. यात मैत्री आहे, ईर्ष्या आहे, स्पर्धा आहे, हेवेदावे आहेत. नेहमीच्या परिचित जगाशी फारकत घेणारे प्रकार आहेत. बेढब, कुरूप आणि ओंगळ माणसेदेखील आहेत. साधारण मध्यानंतर कादंबरीची येणारी पुढची वळणे अतिशय डार्क आणि अनप्रेडिक्टेबल आहेत. कथानकातली उत्सुकता शेवटपर्यंत टिकून राहत असली तरी मधली काही वळणं, विविध पात्रांचं डिव्हास्टेट होत जाणं वगैरे गोष्टी अनावश्यक वाटतात. कादंबरीची सुरुवातीच्या भागातली वातावरणनिर्मिती उत्तम आहे. मुळशी या ठिकाणी घडणारा कादंबरीचा मधला भाग, विशेषकरून सानिका आणि समीरमधला संभाषणाचा भाग उत्कृष्ट घडला आहे. कादंबरीच्या पुढच्या प्रवासाबद्दल आणि एकंदरीत जीवनाबद्दल भाष्य करणारा हा भाग अतिशय प्रगल्भ आहे. कादंबरीचा हाय पॉइंट म्हणावा असा, पण त्यानंतरच्या घटना काळय़ाशार अधिक विचित्र आणि टोकदार होत जातात. घटनाप्रधान गुंतागुंत निर्माण करायच्या नादात अनावश्यक पात्रे आणि मूळ कथानकाशी नातं जोडू पाहणाऱया अनावश्यक घटना व प्रसंगांचा भरणा शेवटाकडे अधिक प्रमाणात झाल्यासारखा वाटतो. या अचानक सामोऱया येणाऱया गोष्टींमुळे उत्कंठा शेवटपर्यंत टिकून राहिली तरी आधी निर्माण केलेल्या एकूण परिणामाची गती मंदावते. कुठलीही कलाकृती वाचून पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला विशिष्ट प्रकारचा फील देत असेल तर ती यशस्वी कलाकृती असते. प्रणव सखदेवची नवी कादंबरी ‘काळेकरडे स्ट्रोक्स’ वाचकाला शेवटी अतिशय कडवट असा फील देते. हे विचारात घेता ही एक यशस्वी कादंबरी ठरते. परीक्षणात सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे नायकाच्या तोंडी असलेल्या प्रथम पुरुषाच्या वापरामुळे कादंबरीचं कथानक वाचकांना रिलेट होऊ शकतं. जर सलग तृतीय पुरुषातला प्रयोग असता तर हे कथानक अतिशय त्रयस्थ भासलं असतं. वाईट घटना, प्रसंग दीर्घकाळ स्मरणात राहून त्रास देतात. त्याचा परिणाम हा बराच वेळ विचारात रेंगाळणारा असतो, पण या कादंबरीबाबत असं होत नाही. त्यातल्या घटना, त्यातल्या पात्रांचं तुटत जाणं आपण त्रयस्थतेने पाहतो. त्यावर काही दिवस विचारही करतो, पण ते आपल्या आत फार खोलवर रुतत नाही. एक प्रकारे याचा परिणाम फार वेळ राहत नाही हा या कथानकाचा चांगलाच गुण आहे असे मी म्हणेन. वाचन करताना आणि वाचन झाल्यानंतर काही काळाकरिताच हे डोक्यात राहतं, किंचित उदास करतं आणि मग जसजसे दिवस जातात तसा याचा परिणाम कमी कमी होत जातो. कॉलेज लाईफ आणि तरुणाईच्या आसपास रेंगाळणाऱया अनेक कथा, कादंबऱया आपण वाचल्या आहेत. त्यापैकी बरीचशी कथानकं प्रेमकहाण्या कथन करणारी आहेत. ‘काळेकरडे स्ट्रोक्स’चं जग, त्यातल्या पात्रांच्या मनोभूमिका चित्रविचित्र आणि गडद आहेत. आपल्याला सुपरिचित असणाऱया मध्यमवर्गीय जगाशी पूर्णपणे फारकत घेणाऱया आहेत. ‘काळेकरडे स्ट्रोक्स’चा एकंदर परिणाम बिटर आफ्टर टेस्ट देणारा असला तरी ही कादंबरी इतर कांदबऱयांपेक्षा वेगळी अनुभूती देणारी ठरते.

काळेकोरडे स्ट्रोक्स

लेखक-प्रणव सखदेव

प्रकाशक-रोहन प्रकाशन

पृष्ठ- 220, किंमत-199 रुपये