
>> बदीऊज्जमा बिराजदार
(साबिर सोलापुरी)
चळवळ प्रेरणास्रोत असते. चळवळीतून स्फूर्तीचे कारंजे उडत असतात. चळवळ सामूहिक शक्ती निर्माण करण्याचे महत्त्वाचे कार्य करत असते. चळवळ शोषित, पीडित वर्गात न्याय्य हक्कासाठी भावना जागृत करते. चळवळीतूनच आंदोलनांना धार येते. अशा ऊर्जावान आंदोलनातून सत्तांतरेही घडतात. चळवळी सरकारवर अंकुश ठेवण्याचे कामही करतात. चळवळीचे सामर्थ्य अनन्यसाधारण आहे. चळवळीतला जिवंतपणा लोकशाहीला सुदृढ करत असतो. चळवळीचे महत्त्व कुणालाही नाकारता येण्यासारखे नाही. चळवळीतूनच इतिहास घडतो. हा इतिहास येणाऱ्या पिढय़ांसाठी प्रेरणादायी ठरतो.
एकेकाळी जगभर गिरणगाव म्हणून लौकिक असलेले सोलापूर चळवळींची खाण आहे. सोलापुरात विविध जातीधर्माचे लोक राहत असल्याने इथल्या चळवळीचे स्वरूपही प्रारंभापासून बहुपेडी राहिलेय. इथं स्वातंत्र्य चळवळ, कामगार चळवळ, औद्योगिक चळवळ, शेतकरी चळवळ, महिला चळवळ, विद्यार्थी चळवळ, आंबेडकरी चळवळ, विद्रोही चळवळ, परिवर्तनवादी चळवळ अशा कितीतरी महत्त्वाच्या चळवळी उदयास आल्या. याच चळवळींनी आपल्या धगधगत्या कार्यांनी काळाचा विस्तीर्ण पट व्यापला.
इथल्या स्वातंत्र्यलढ्याची चळवळ तर अख्ख्या देशाचे लक्ष वेधून घेणारी ठरली. हुतात्मा जगन्नाथ शिंदे, कुर्बान हुसेन, किसान सारडा, मल्लप्पा धनशेट्टी या चार हुतात्म्यांच्या अभूतपूर्व धाडसाने, बलिदानाने सोलापूरने सगळ्यात अगोदर म्हणजे स्वातंत्र्य मिळण्यापूर्वीच स्वातंत्र्य उपभोगलं. स्वातंत्र्यसंग्रामाच्या इतिहासात या चळवळीनं आपला अमीट ठसा उमटविला. या चळवळीत देशाभिमानी कामगारांचेही मोठे योगदान आहे.नंतरच्या कालखंडात सोलापुरात ज्या विविध चळवळी आकारास आल्या. त्यामागील मूळ प्रेरणा अन् चालना स्वातंत्र्य चळवळच होती, असे म्हटल्यास ते वावगे नाही ठरणार. ती स्वातंत्र्य चळवळ इतकी देशप्रेमाच्या भावनेने भरलेली, भारलेली होती. हे गिरण्याचे शहर असल्याने सोलापूरची खरी ओळख गिरणगाव अशीच होती. म्हणून इथे कामगार चळवळही तितक्याच जोमाने उत्स्फूर्तपणे फुलत गेली. त्यात कम्युनिस्ट पक्ष, आयटक, सिटू या कामगार संघटनांबरोबरच कामगारांविषयी आंतरिक तळमळ अन् त्यांच्या न्याय्य हक्काची जाणीव असलेले झुंजार नेते, कामगार हितासाठी अहोरात्र झटणारे हाडाचे कार्यकर्ते यांच्यामुळे कामगार चळवळ सर्वांगाने फोफावत गेली.
कामगारांना त्यांच्या घामाचा योग्य दाम मिळावा, त्यांच्या हक्कांची पायमल्ली होता कामा नये याकरिता मालकशाही, भांडवलशाहीविरुद्ध कामगार चळवळीच्या माध्यमातून अनेक अविस्मरणीय लढे उभारण्यात आले. त्यात पहिल्यांदा गाजलेल्या भीमराव नागणे यांचा संप, मार्शल लॉ अन् कामगार चळवळीतून उभारण्यात आलेली संघर्षाची अजोड परंपरा अन् रोमहर्षक इतिहास संजय जोगीपेठकर यांनी मोठ्या मेहनतीने, तडफेने सोलापूरची देदीप्यमान चळवळ ग्रंथातून मांडलाय. सोलापूरच्या तत्कालीन चळवळीचे स्वरूप अन् वस्तुनिष्ठ इतिहास नव्या पिढीसमोर यावा या नितळ उद्देशाने जोगीपेठकर यांनी केलेली मांडणी अतिशय महत्त्वाची आहे.
चळवळीमध्ये प्राणपणे हिस्सेदारी करणाऱ्यांचा पत्ता कट करण्याचे कारस्थान अनेक वेळा दिसून येते. खरा इतिहास लोकांसमोर येऊच नये, असा प्रयत्नही केला जातो. चळवळीच्या इतिहासाची निराधार, चुकीची मांडणीही करण्यात येते. म्हणून चळवळीचा इतिहास सजगतेने वाचावा लागतो. डोळसपणे तपासावा लागतो. खरा इतिहास सांगावा लागतो. त्यातील सम्यकता शोधावी लागते. कोणत्याही चळवळीच्या इतिहासाची पुनर्मांडणी करताना हे पथ्य कटाक्षानं पाळावं लागतं. या पार्श्वभूमीवर संजय जोगीपेठकर यांनी पुराव्यानिशी, बारकाव्यानिशी चळवळीचा खरा इतिहास ‘सोलापूरची देदीप्यमान चळवळ’ या मौलिक ग्रंथातून मांडलाय. चळवळीच्या इतिहासातील जाणीवपूर्वक गहाळ करण्यात आलेली पानेही जोगीपेठकर यांनी या ग्रंथात जोडल्यामुळे लपवाछपवी करणाऱ्यांचं पितळ उघडं पडलंय. हे पुस्तक चळवळीच्या सर्वांगानं अभ्यास करणाऱ्या अभ्यासकांना, संशोधकांसाठी परिपूर्ण पायाभूत माहितीचा स्रोत ठरेल यात शंका नाही.
सौद्धांतिक लढ्याबरोबरच ज्या विविध चळवळी सोलापूरच्या भूमीत रुजल्या त्याचा संक्षिप्त इतिहास प्रस्तुत पुस्तकात मांडण्यात आलाय. सोलापुरात वस्त्रोद्योगास सर्वच बाबींनी अनुकूल वातावरण होतं. त्यामुळं इथं जुनी गिरणी, नरसिंग गिरजी, लक्ष्मी-विष्णू अन् जामश्री अशा महाकाय कापड गिरण्या उभ्या राहिल्या. या गिरण्यामुळं सोलापूरचं नाव जगाच्या नकाशावर झळकलं, परंतु कामगारांचं होणारं शोषण, अधिकाऱ्यांची पराकोटीची मुजोरी अन् कामगारांवर वाढत चाललेल्या अन्यायाविरुद्ध कॉ. भीमराव नागणे यांच्या नेतृत्वाखाली तब्बल सहा महिने संप चालला, या संबंधानं डाव्या चळवळीनं अर्थात लाल बावट्यानं केलेल्या सक्रिय कार्याची नोंद घेण्यात आलीय.
सोलापुरातील महिलांच्या चळवळीवरही जोगीपेठकर यांनी अभ्यासपूर्ण भाष्य नोंदवलय. 21 ऑक्टोबर 1934 रोजी शिवकरण मांगीलाल यांच्या विडी कारखान्यातील महिलांनी त्यांच्यावरील अन्यायाला वाचा फोडण्यासाठी चळवळीच्या इतिहासातील महिलांचा पहिला संप पुकारला. या चळवळीतील सहा महिलांना तुरुंगवासही भोगावा लागला. अशा तऱ्हेने कारखानदारांच्या अन्यायाविरुद्ध मूठ आवळून महिला चळवळीचा पाया घालण्यात आला. आजमितीसही सोलापुरातील विविध चळवळींच्या आंदोलनात महिलाच आघाडीवर असल्याचे दिसून येते. सोलापुरातील पहिल्या महिला आंदोलक ठरलेल्या, विडी कामगार महिलांच्या चळवळीला ऊर्जा पुरविणाऱ्या कॉ. मीनाक्षीताई साने लिखित दुर्मिळ पुस्तकाचे पुनर्प्रकाशित या ग्रंथात करण्यात आलंय. त्यामुळे नव्या पिढीला त्या काळाची, चळवळीची सांगोपांग माहिती मिळते. याबरोबरच विद्यार्थी चळवळ, शेतकरी चळवळ, विद्रोही सांस्कृतिक चळवळीचाही बारीकसारीक धांडोळाही घेण्यात आलाय.
सोलापूरच्या भूमीत स्वातंत्र्यलढ्याच्या चळवळीची बीजं रोवली गेल्यानं ही भूमी नेहमीच परिवर्तनवादी विचारांना आपलंसं करणारी ठरलीय. इथं आंबेडकर चळवळ, विद्रोही चळवळ खोलवर रुजणं अपेक्षितच होतं. या माध्यमातून सोलापूरची पुरोगामी चळवळ तेजाळत राहिली. या महत्त्वाच्या बदलावरही जोगीपेठकर यांनी प्रकाशझोत टाकलाय.
स्मृतिशेषमध्ये डाव्या चळवळीतील लढवय्ये कॉ. श्रीनिवास सरदेसाई, मीनाक्षीताई साने, रघुनाथ कऱ्हाडकर, गोविंद साने, व्यंकप्पा मडूर, चिंतामणी इंदापुरे, शाहीर अमर शेख, भाई छनुसिंग चंदेले, शंकरप्पा धनशेट्टी, शाहीर विश्वासराव फाटे, एस. एम. पाटील, गणपतराव देशमुख आदींच्या निःस्पृह सेवेची दखल घेऊन त्यांना लाल सलाम करण्यात आलाय, तर आज हयात असणाऱ्या या चळवळीच्या शिलेदारात रा. व्य. गणाचार्य, न. ना. आडम मास्तर, ता. अ. ठोंबरे, सुभाषण्णा पाटील, रा. गो. म्हेत्रस, र. पां. मोकाशी, अ. बा. नदाफ आदी धुरिणांच्या कारकिर्दीचा आढावा घेण्यात आलाय. त्या काळात प्रसंगानुरूप वेळोवेळी काढण्यात आलेल्या मोर्चांची, आंदोलनांची छायाचित्रे अन् नेत्यांचे फोटो या पुस्तकात अतिशय कल्पकतेने वापरण्यात आलीयत. शब्दांबरोबरच छायाचित्रंही खूप काही बोलणारी आहेत. या मांडणीमुळे चळवळीचा इतिहास जिवंत वाटतो.
आज सर्वत्र मुक्त चळवळींना ‘एनजीओ’ आपल्या विळख्यांनी करकचून बांधून ठेवलंय. त्यामुळं चळवळीचं नामशेष होण्याच्या मार्गावर पोहोचल्यात. पूर्वीसारखं समर्पित भावनेने कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांचीही प्रकर्षाने वानवा जाणवतेय. अशा परिस्थितीत हे पुस्तक तमाम चळवळींना अन् कार्यकर्त्यांना कार्याची प्रेरणा देत राहील, अशी खात्री बाळगायला हरकत नाही.
सोलापूरची देदीप्यमान चळवळ
लेखन, संपादन : संजय जोगीपेठकर
प्रकाशक : लोकवाङ्मय गृह, मुंबई
पृष्ठ : 210, मूल्य : रुपये 250/-




























































