
डोंबिवलीतील हाऊसिंग सोसायटीच्या आवारात खेळताना एक दुर्दैवी घटना घडली. हाऊसिंग सोसायटीच्या आवारात खेळता खेळता 5 वर्षीय अल्पवयीन मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला. किड्स गेम झोनमध्ये खेळताना या चिमुकल्याचा करुण अंत झाला आहे. सक्षम उंडे असं या चिमुकल्याचं नाव आहे. सिनियर केजीमध्ये वर्गात शिकणारा हा मुलगा मंगळवारी त्यांच्या निवासी संकुलातील किड्स गेम झोनमध्ये खेळायला गेला होता. तो खेळत असताना त्याची आई बाहेर थांबली होती.
नेमकं काय घडलं?
डोंबिवलीच्या हायराईज कॉम्प्लेक्समधील किड्स गेम झोनमध्ये मंगळवारी संध्याकाळी पाच वर्षीय सक्षम उंडे या चिमुकल्याची मान प्लास्टिकच्या जाळीत अडकली, जाळीतून मान बाहेर काढता न आल्याने गळफास लागून या मुलाचा मृत्यू झाला. डोंबिवली पूर्वेला असलेल्या रिजन्सी अनंतममध्ये ही घटना घडली आहे. सक्षम उंडे मृत्यूप्रकरणी सखोल चौकशी करून, याला कोण जबाबदार आहे हे शोधून काढण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. या प्रकरणी मानपाडा पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली असून ते अधिक तपास करत आहेत.
सक्षम हा त्याच्या आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा होता. त्याचे वडील भरत हे एका खासगी कंपनीत कामाला असून ते वर्क फ्रॉम होम करतात. सक्षमची आई ही गृहिणी आहे. पोलिसांनी सांगितले की मंगळवारी सक्षम आणि त्याची आई किंडस झोनमध्ये आले होते. सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानोबा सुर्यवंशी यांनी सांगितले की, “गेम झोनमध्ये मोठ्या माणसांना परवानगी नसल्याने मुलाची आई बाहेर थांबली होती. गेम झोनचे दोन केअरटेकरद्वारे मुलांची काळजी घेत असतात. सक्षम खेळत असताना अचानक सक्षमच्या गळ्यात जाळी अडकली आणि तो काही सेकंदात तो बेशुद्ध पडला.”
पुढे सुर्यवंशी म्हणाले की, रहिवाशांनी त्याला ताबडतोब बाहेर काढले आणि त्याला जवळच्या एम्स रुग्णालयात नेण्यात आले जेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. कॉम्प्लेक्समधील रहिवासी लता अरगडे यांनी सांगितले, “अनेक मुले गेम झोनमध्ये खेळायला जातात म्हणून पोलिसांनी निष्काळजीपणाबद्दल या प्रकरणाची सखोल चौकशी करावी. रिजंसी अनंतमचे विकासक क्लब हाऊस, स्विमिंग पूल आणि मुलांच्या खेळाचे क्षेत्राचे व्यवस्थापन पाहतात,अनेकदा प्रयत्न करूनही त्यांनी दर प्रकरणी प्रतिक्रिया दिली नाही.
याआधी मे 2016 मध्ये एका आठ वर्षांच्या मुलीने तिच्या प्रशिक्षकांचे लक्ष चुकवून कल्याणमधील रोजाली गृहसंकुलातील प्रौढ जलतरण तलावात प्रवेश केल्याने तिचा बुडून मृत्यू झाला होता. मे 2018 मध्ये डोंबिवलीतील पलावा टाऊनशिपमधील कासा बेला अपार्टमेंटमधील क्लब हाऊसमधील तलावात सहा वर्षांच्या मुलीचा बुडून मृत्यू झाला होता.

























































