
सामना ऑनलाईन,अंबाजोगाई
दुकानच्या पत्र्यावर पडलेला बॉल काढण्यासाठी गेलेल्या लहान मुलाला जवळून गेलेल्या विद्युत तारेचा झटका बसून तो गंभीर जखमी झाला आहे. ही घटना अंबाजोगाईच्या मोंढा भागात घडली आहे. कन्हैय्या नेताजी पवार (वय-१२) असे या बालकाचे नाव आहे. त्याच्या वडिलांचे अंबाजोगाईच्या मोंढा भागात दुकान आहे. शुक्रवारी सायंकाळी ७.३० वाजताच्या सुमारास तो खेळत असताना पत्र्यावर पडलेला बॉल काढण्यासाठी तो दुकानावर चढला. या दुकानावरून विद्युत पुरवठ्याची तार गेलेली आहे. बॉल काढत असताना अनवधानाने कन्हैय्याचा धक्का या तारेस लागला आणि विजेच्या झटक्याने तो दूर फेकला गेला. यात कन्हैय्याच्या मानेला आणि पायाला गंभीर इजा झाली आहे. त्याच्यावर अंबाजोगाई येथील स्वाराती रुग्णालयात उपचार सुरु असून त्याची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे सूत्रांनी सांगितले.




























































