
स्वच्छ-सुंदर मुंबईसाठी पालिकेच्या माध्यमातून सर्व 25 वॉर्डमध्ये आता दररोज ‘डीप क्लिनिंग’ उपक्रम राबवण्यात येणार आहे. यासाठी पालिकेने आज नवीन नियमावली जाहीर केली आहे. या उपक्रमात पालिका रस्त्यांच्या स्वच्छतेसह फुटपाथ फेरीवाला मुक्त, भिकारीमुक्त, रस्ते बेकायदा पार्किंगमुक्त करण्यात येणार आहेत. रस्ते-ब्रीजवरील बेकायदा होर्डिंग हटवण्यात येणार आहेत. शिवाय स्वच्छतागृहांसह सर्व झोपडपट्टीतील गल्ल्याही कचरामुक्त आणि स्वच्छ करण्यात येणार आहेत.
मुंबईला कचरामुक्त स्वच्छ-सुंदर बनवण्यासाठी पालिकेच्या माध्यमातून 3 डिसेंबरपासून ‘डीप क्लिनिंग’ उपक्रम राबवण्यात येत आहे. या उपक्रमाची परिणामकारकता वाढवण्यासाठी पालिकेने सर्व वॉर्डना कार्यक्षमतेने काम करण्याचे निर्देश दिले आहेत. यानुसार सर्व सात झोनमध्ये किमान एक वॉर्ड या उपक्रमात सहभागी करून घेण्यात येणार आहे. सकाळी 6 ते दुपारी 2 या वेळेत हा उपक्रम राबवला जाणार आहे. यात पालिकेच्या सर्व विभागांसह लोकप्रतिनिधी, सेलिब्रिटी, विद्यार्थी, एनएसएस, एनजीओ, सोसायटय़ा, स्वयंसेवक सहभागी होणार आहे. यात सकाळी 7 ते 11 या केळेत रस्ते आणि सार्वजनिक शौचालयांच्या स्वच्छतेचे परिक्षण करण्यासाठी आणि प्रदूषण नियंत्रण मार्गदर्शक तत्त्वांचे पालन सुनिश्चित करण्यासाठी भेट दिली जाईल. पालिकेच्या सर्व आस्थापनांमध्ये संबंधित विभागाच्या (वॉर्ड) सहाय्यक आयुक्तांच्या समन्वयाने संपूर्ण स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे. विभागातील सहाय्यक आयुक्त यांनी एक नोडल अधिकारी नियुक्त करतील जे अहवाल देतील आणि त्यांच्या संबंधित विभागातील कार्यक्रमाचे वेळापत्रकदेखील देतील.
अशी आहे नियमावली
– सोमकार ते शुक्रवार या कालावधीत सहाय्यक आयुक्त व कार्यकारी अभियंत्यांनी परिसरातील सद्यस्थितीचा आढावा घेऊन बेवारस वाहने हटविणे, सार्वजनिक ठिकाण, अनधिकृत बांधकामे, धोकादायक झाडे, बॅनर व फलक हटविण्याच्या नोटीस बजावून संबंधितांना योग्य त्या सूचना देणे.
– विभागातील चौपाटी नीटनेटकी व स्वच्छ ठेवण्यात येईल. सकाळी 6.30 वाजल्यापासून रस्ते स्वच्छ करून ब्रशिंग करावेत. परिणामी होणारी धूळ, गाळ व पाण्याच्या तळ्यांसह गोळा करून नंतर फायरॅक्स/ डिस्लजिंग/ पाण्याच्या टँकरने धुतले जातील.
– संपूर्ण स्वच्छता मोहिमेच्या ठिकाणाहून संकलित केलेल्या अनावश्यक साहित्याची स्वतंत्र वाहनाद्वारे विल्हेवाट लावली जाईल. रस्त्यालगतच्या भिंती, ज्यांचे सुशोभीकरण करता येईल ते सौंदर्यविषयक डिझाइन्स आणि सामाजिक संदेशांसह (विभागाच्या सहाय्यक आयुक्तांनी ठरवलेल्या थीमवर आधारित) रंगवले जातील.


























































