
सामना प्रतिनिधी । वाराणसी
राम मंदिराबाबत चर्चेची वेळ निघून गेली असून जर वेळीच राम मंदिर नाही बनवले तर देशातील स्थिती बिघडू शकते असा इशारा बाबा रामदेव यांनी दिला आहे. बाबा रामदेव वारणसीच्या दौर्यावर आहेत. दौर्यातील कार्यक्रमादरम्यान त्यांनी हे वक्त्यव्य केले आहे. बाबा रामदेव म्हणाले, की जर आता राम मंदिर नाही बनवले तर देशातील वातावरण बिघडू शकते. तसेच राम मंदिराला कुठल्याही पक्षाचा राजकीय विरोध असू शकतो परंतु भगवान रामला कुणाचा विरोध नसणार असेही ते यावेळी म्हणाले.
आर्ट ऑफ लिविंग चे श्री श्री रविशंकर यांनी चर्चेच्या माध्यमातून राम मंदिराचा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला. यावर बाबा रामदेव म्हणाले की आता चर्चेची वेळ टळून गेली आहे. राम मंदिराबाबत संसदेत कायदा आणण्याशिवाय दुसरा पर्याय नसल्याचे त्यांनी सांगितले. आता नाही तर कधीच नाही असे समजून काम केले पहिजे असे बाबा रामदेव म्हणाले. हिंदुस्थानात हिंदू आणि मुस्लीमांना कुठलाच धोका नाही कारण अहिंसा आणि प्रेम ही आपल्या देशाची मूलतत्वे आहेत. म्हणून सध्या देशात धार्मिक उन्माद नाही, जर वेळीच राम मंदिर नाही बांधले तर धार्मिक वातावरण निर्माण होऊन देशातील वातावरण बिघडू शकते असेही बाबा रामदेव म्हणाले.
तसेच संसदेतून राम मंदिराचा कायदा आणावा हा शेवटचा पर्याय असल्याचे त्यांनी सांगितले. सर्वोच्च न्यायालयाला काही मर्यादा असल्याचे त्यांनी म्हटले. संसद सर्वश्रेष्ठ आहे म्हणून संसदेतून राम मंदिराचा अध्यादेश निघावा असे त्यांनी यावेळी म्हटले.






















































