
सामना प्रतिनिधी । कोपरगाव
कोपरगाव बस आगाराच्या सेवेतून निवृत्त झालेले अधिकारी आणि दररोज वृत्तपत्राच्या वाचकांची पत्रे या सदरात लिखाण करणारे कहार समाजाचे ज्येष्ठ कार्यकर्ते बजरंग विठ्ठल लचुरे (८५) यांचे ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या मृत्यूनंतर आठ तासांनी मोठ्या बहिणीचेही निधन झाले.
देशात पेट्रोल डिझेलचा वाढता भडका आणि त्यातून निर्माण झालेली महागाई या संदर्भातील वाचकांचे पत्र लिहून संबंधीत वार्ताहरांना देत असताना त्यांना शुक्रवारी डॉ. क्षीरसागर रूग्णालयासमोर हदयविकाराचा तीव्र झटका आला आणि ते रस्त्यातच कोसळले. लचुरे यांना माजी नगरसेवक बबलू वाणी व परिसरातील सामाजिक कार्यकर्त्यांनी तात्काळ दवाखान्यात हलविले पण त्यांचा मृत्यू झाला. भावाच्या निधनांचे वृत्त समजताच त्यांची मोठी बहीण श्रीमती शांताबाई नंदराम लकारे (९५) यांचेही आठ तासांच्या अंतरांने शनिवारी पहाटे निधन झाले. शांताबाई यांच्या मागे तीन मुले नातवंडे तर कै. बजरंग लचुरे यांच्या मागे दोन मुले दोन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
बजरंग लचुरे सेवानिवृत्तीनंतरही दैनंदिन जीवनातील समस्यांवर लिखाण करत होते. कोपरगांव शहर आणि मतदार संघाच्या विकासाबाबतही त्यांनी वाचकांची पत्रे लिहिली. दरम्यान, बहीण-भावाच्या अशा एकाच दिवशी जाण्यावर लोकांनी हळहळ व्यक्त केली.

























































