घोड नदीपात्रात बुडून बहिण भावाचा मृत्यू

सामना प्रतिनिधी । आंबेगाव

आंबेगाव तालुक्यातील वडगाव काशिबेग येथील घोड नदीपात्रात कपडे धुण्यासाठी गेलेल्या बहिण भावाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. काजल पवार (15) आणि प्रेम पवार (10) अशी मृत्यू पावलेल्या मुलांची नावं आहेत. पुण्यातल्या विश्रांतवाडी येथील विजय पवार कुटुंबीयांसह वडगाव काशिबेग येथे व्यवसायासाठी आले होते. उदर निर्वाहासाठी शेतीला आवश्यक असणारी खुरपी आणि इतर अवजारे तयार करण्याचे काम ते करतात. शनिवारी विजय पत्नीसह चाकण येथील बाजारात खुरपी विकण्यासाठी गेले होते. त्यावेळी घरी असलेली मुलं नदीवर कपडे धुण्यासाठी गेले असता ही दुर्घटना घडली.

विजय पवार हे पत्नी आणि चार मुलांसह वडगाव काशिबेग येथे व्यवसायासाठी आले होते. शनिवारी ते चाकणच्या बाजारात पत्नीसह खुरपी विकण्यासाठी गेले होते. त्यांच्या झोपडीमध्ये मुलगी दिव्या (16), क्रिश (10), काजल (15), प्रेम (10) आणि विजय यांचा गतिमंद भाऊ अनिल पवार हे होते. घरातील कपडे धुण्यासाठी घोडनदीवर क्रिश, काजल, प्रेम, दिव्या आणि अनिल हे गेले होते. त्यावेळी कपडे धुत असताना काजल आणि प्रेम पाण्यात बुडाले. यावेळी इतर भावडांनी आरडाओरडा केला असता गावातील तरुणांनी नदीकडे धाव घेतली. त्यांनी बुडालेल्‍या काजल आणि प्रेमला बाहेर काढले. मात्र दोघांचाही मृत्यू झाला होता. घटनास्थळी मंचर पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरिक्षक सोमनाथ पांचाळ आणि त्यांच्या सहकार्‍यांनी भेट देत पंचनामा केला. तसेच दोघांचे मृतदेह मंचर उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करुन नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले.

आपली प्रतिक्रिया द्या