
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात लढणाऱ्या एनडीएला विरोध करण्यासाठी म्हणून उत्तर प्रदेशात एकत्र आलेले सपा-बसपा या दोन पक्षांचे महागठबंधन अखेर तुटले आहे. यापुढे येणाऱ्या पोटनिवडणुका आणि अन्य निवडणुका या आम्ही स्वबळावर लढू, असे बसपा अध्यक्षा मायावती यांनी आज स्पष्ट केले. मात्र असे असले तरी अखिलेश यादव यांच्या परिवारासोबत जोडले गेलेले संबंध कायम राहतील, तसेच सपामध्ये योग्य बदल केल्यास आम्ही पुन्हा एकत्र येऊ शकतो, असेही त्यांनी सांगितेल.
BSP Chief Mayawati on SP-BSP coalition: It’s not a permanent break. If we feel in future that SP Chief succeeds in his political work, we’ll again work together. But if he doesn’t succeed, it’ll be good for us to work separately. So we’ve decided to fight the by-elections alone. pic.twitter.com/VP20N4zL4Y
— ANI UP (@ANINewsUP) June 4, 2019
भाजपला जातीयवादी संघटना म्हणत मायावती यांनी आज पुन्हा एकदा मोदी-शहांच्या विरोधात टीका केली. तसेच सपा-बसपाच्या महागठबंधनात बसपाने खूप मेहनत घेतली. मात्र अखिलेश यांचा पक्ष यादवांची मतं आपल्याकडे वळवण्यात अयशस्वी राहिले ज्याचा फायदा भाजप प्रणित एनडीएला झाल्याचे मायावती म्हणाल्या. यादव बहुल भागात देखील यादवांची मते महागठबंधनला न मिळाल्याने अखिलेश यांची पत्नी डिंपल यादव यांच्यासह सर्वच बड्या उमेदवारांना त्याचा फटका बसला आहे. त्यामुळे अखिलेश यांनी सपामध्ये बदल करणे आवश्यक आहे. सपा-बसपा महागठबंधनात हा कायमचा ब्रेक नाही, तर यादव यांच्या परिवारासोबतचे नाते यापुढेही चांगले राहील. अखिलेश यांनी आपल्या कार्यकर्त्यांना राजकीय कार्यक्रमासह मिशनरी बनवले तर आम्ही पुन्हा सोबत लढू, असेही त्या यावेळी म्हणाल्या. समाजावाद्यांमध्ये सुधारणा न झाल्यास एकटेच लढलेले चांगले, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.




























































