
सामना प्रतिनिधी, चंद्रपूर
राज्यातील शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करू पाहणाऱ्या चोर बीटी अर्थात प्रतिबंधित कापूस बियाण्यांचा भला मोठा साठा जप्त करून चंद्रपूरच्या कृषी आणि पोलीस विभागाने उल्लेखनीय यश प्राप्त केले आहे.
राज्यात प्रतिबंधित, उगवण क्षमता नसलेल्या, एक्स्पायरी माहीत नसलेल्या आणि उत्पादन ठिकाण नमूद नसलेल्या या सुमारे १ कोटी रुपये किमतीचा साठा तेलंगणा राज्यातून महाराष्ट्रात आणला जात होता. या प्रकरणी ट्रकचालकाला ताब्यात घेण्यात आले आहे . राज्यात पुढील काळात नवा शेती हंगाम प्रारंभ होत आहे. या पार्श्वभूमीवर बियाण्यांची बेगमी करून ठेवण्याकडे शेतकऱ्यांचा कल असतो. हीच मानसिकता लक्षात घेत अनधिकृत असलेले आणि मानव पिढीसाठी घातक असलेले चोर बीटी शेतकऱ्यांच्या माथी मारण्याचे उद्योग मोठ्या प्रमाणात सुरु झाले आहेत. चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा तालुक्यातील लक्कडकोट या गावी असलेल्या आंतरराज्य सीमा तपासणी नाक्यावर कृषी विभाग आणि पोलिसांनी एक धडक कारवाई करत तब्बल १ कोटी रुपयांचे बीटी बियाणे जप्त केले.
राज्य आणि केंद्र सरकारने या बियाण्यांवर सरसकट बंदी घातली आहे. तरीही कर्नाटक-तेलंगणा-गुजरात आदी राज्यातून कापूस उत्पादक राज्यात हे प्रतिबंधित बियाणे सर्रासपणे विकले जातात. मान्यताप्राप्त दुकानांपेक्षा एखाद्या बड्या शेतकऱ्यांच्या घरी हा माल उतरवून त्याची बेभाव विक्री केली जाते. एका आयशर ट्रकमधून हे बियाणे महाराष्ट्रात प्रवेश करणार असल्याची माहिती कृषी विभागाला मिळाली होती. त्यानुसार पाळत ठेवून ही कारवाई करण्यात आली. हा माल आसिफाबाद येथूल चंद्रपूर जिल्ह्यातील मूल येथे आणला जात असल्याची माहिती ट्रकच्याचालकाने दिली आहे.
दरम्यान ‘अरुणोदय’ आणि ‘स्नेहा’ अशी या बीटी बियाणे कंपन्यांची नावे आहेत. या पाकिटांवर उत्पादन ठिकाण- तिथी- प्रमाणपत्र नाहीत. उगवण क्षमता निश्चित नाही. वर किंमत देखील छापलेली नाही. शेतकऱ्यांच्या माथी चढ्या दराने मातीमोल बियाणे मारून त्यांचा आर्थिक-मानसिक छळ चालविला जात असून, त्यांचा हंगाम वाया घालविण्याचा कट असल्याची प्रतिक्रिया कृषी अधिकाऱ्यांनी या लक्षवेधी कारवाईनंतर दिली आहे. दरम्यान, अडचणीत असलेले शेतकरी पुन्हा एकदा बीटी बियाण्यांच्या विक्रेत्यांचे लक्ष्य बनले जात असल्याचे पुढे आले असून 10 दिवसांआधी जिवती तालुक्यातील मारईपाटण येथे असाच एक मोठा साठा जप्त केला गेला होता. त्यावरून शेती क्षेत्रात असलेल्या सर्वांनी या फसवणुकीपासून सावध राहण्याचे आवाहन कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी केले आहे.




























































