
चार्टर्ड अकाऊंटंटच्या (सीए) अंतिम परीक्षेत देशात महाराष्ट्राचा झेंडा उंचावला आहे. नव्या अभ्यासक्रमानुसार झालेल्या या परीक्षेत डोंबिवलीच्या वैभव हरिहरन याने देशात दुसरा क्रमांक पटकावला आहे. त्याने 800 पैकी 601 गुण मिळवले. अवघ्या दहा गुणांनी त्याचा पहिला क्रमांक हुकला. छत्तीसगढमधील रायपूर येथील भ्रमर जैन हा विद्यार्थी 800 पैकी 611 गुण मिळवून देशात अव्वल ठरला.
22 वर्षीय वैभव हरिहरन हा डोंबिवलीतील खंबाळपाडा येथील हिरेन अपार्टमेंटमध्ये राहतो. त्याचे वडील बँक ऑफ बडोदामध्ये नोकरी करतात तर आई शिक्षिका आहे. वैभवने दहावीच्या परीक्षेत 99.60 गुण मिळविले होते. महाविद्यालयीन शिक्षणासाठी त्याने पोद्दार महाविद्यालयात वाणिज्य शाखेत प्रवेश घेतला. 12वीत त्याने 96 टक्के गुण प्राप्त केले. मुंबई युनिव्हर्सिटीमधून 90 टक्के गुण मिळवून पहिला येण्याचा मान मिळविला. वैभव देशात दुसरा जरी आला असला तरी महाराष्ट्राचे नाव त्याने देशात उंचावल्याचा आम्हाला सार्थ अभिमान असल्याची प्रतिक्रिया त्याच्या आई-वडिलांनी व्यक्त केली.
फायनान्शियल मॅनेजमेंटमध्ये करीअर करायचेय!
‘2017 साली डोंबिवलीकर राज शेठ हा सीए परीक्षेत देशात पहिला आला होता. त्याचा आदर्श ठेवून महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना सीए परीक्षेत बसण्याचे ठरविले आणि त्यादृष्टीने अभ्यासाला सुरुवात केली. सुरुवातीला 10 ते 12 तास आणि नंतर जशी परीक्षा जवळ आली तशी 15 ते 18 तास अभ्यास केल्याचे तो सांगतो. पुढे फायनान्शियल मॅनेजमेंटमध्ये करीअर करायचेय.’
– वैभव हरिहरन





























































