
सामना ऑनलाईन । हंगेरी
हंगेरीतील बुडापेस्टमध्ये एक अनोखे रेस्टाँरेट सुरू करण्यात आले आहे. या रेस्टाँरंटमध्ये रोबो वेटरचे सर्व काम करत आहेत. ग्राहकांना त्यांनी ऑर्डर केलेले खाद्यपदार्थ पोहचवत आहेत. तसेच त्यांच्याशी संवादही साधत आहेत. काही ग्राहकांसोबत डान्स करून ते त्यांचे मनोरंजनही करत आहे. तसेच ग्राहकांचा चांगला मूड बनवण्यासाठी ते त्यांना जोकही सांगत आहेत. या अनोख्या रेस्टाँरेटला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.
एन्जॉय बुडापोस्ट रेस्टाँरंट एका आयटी कंपनीने सुरू केले आहे. या रेस्टाँरंटमध्ये कामासाठी रोबोटचे एक पथक तैनात ठेवण्यात आले आहे. जनतेला आर्टिफिशयल इंटेलिजन्स तंत्रज्ञानाची माहिती मिळावी, हाच या रेस्टाँरंटचा उद्देश असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे. ग्राहकांपर्यत खाद्यपदार्थ पोहचवण्यासाठी रोबोटसाठी एक विशिष्ट रस्ता ठेवण्यात आला आहे. या मार्गावर ग्राहकांनी येऊ नये, अशा सूचना ग्राहकांना देण्यात आल्या आहेत. काही रोबोट रेस्टाँरंटमध्ये रिसेप्शनिस्टचे काम करतात. ग्राहकांशी संवाद साधून ते त्यांना सहकार्य करतात. तसेच ग्राहकांनी आग्रह केल्यास काही रोबोट ग्राहकांसोबत डान्सही करतात. त्यामुळे बच्चेकंपनीचे हे आवडते रेस्टाँरंट ठरले आहे.
ग्राहक रोबोटच्या सेवेवर खूश आहेत. त्यामुळे कंपनीने 16 ते 20 रोबोट ग्राहकांच्या सेवेत ठेवले आहेत. या रेस्टाँरंटमध्ये आम्ही रोबोट कामासाठी ठेवले आहेत, याचा अर्थ आम्हाला मनुष्यबळाची गरज नाही, असा होत नाही. आम्हाला हे नवीन तंत्रज्ञान जनतेपर्यंत पोहचवायचे आहे. तसेच सुमारे 12 तास रोबोटकडून अचूक काम करून घेण्यासाठी आम्ही तंत्रज्ञांचे एक पथक ठेवले आहे. ते रोबोटवर देखरेख ठेवतात, असे कंपनीने स्पष्ट केले आहे. या अनोख्या फंड्यामुळे हे रेस्टाँरंट लोकप्रिय होत आहे.

























































