
महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचं अवमान करणारं विधान तसेच महाराष्ट्रातील महापुरुषांचा अवमान करणाऱ्या राज्यपालांना हटवण्यासाठी आता 13 डिसेंबर रोजी पुणे बंदची हाक देण्यात आली आहे.
पुण्यातील एसएसपीएम महाविद्यालयातील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याजवळ आज राज्यातील विरोधी पक्ष आणि विविध संस्थांची एक बैठक बोलवण्यात आली होती. या बैठकीत राज्यापाल भगतसिंग कोश्यारी यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा निषेध करण्यात आला. तसेच मंगळवार, 13 डिसेंबर रोजी पुण्यात राज्यपालांविरोधात बंद ठेवण्यात येणार आहे. संभाजी ब्रिगेडचे संतोष शिंदे यांनी यासंदर्भात माहिती दिली. ‘शिवप्रेमींच्या वतीने सर्वानुमते छत्रपती शिवाजी महाराजांच्या सन्मानार्थ 13 डिसेंबर रोजी पुणे बंदचा निर्णय घेण्यात आला आहे. शिवप्रेमींनी संवैधानिक पद्धतीने आणि स्वयंप्रेरणेने या बंदमध्ये सहभागी व्हावे’, अशी विनंती देखील शिंदे यांनी यावेळी केली.


























































