कँडल लाइट डिनर बेतू शकतो जिवावर.. कसा? वाचा सविस्तर

आपल्या जोडीदारासोबत वेळ घालवणं, त्याला भेटवस्तू देणं किंवा त्याच्यासोबत कँडल लाईट डिनरचा आस्वाद घेणं ही तमाम प्रेमीजनांची आवडती गोष्ट. अनेक महिलाही आपल्या पती अथवा प्रियकराने आपल्याला कँडल लाईट डिनरला न्यावं अशी अपेक्षा करत असतात. पण, हाच कँडल लाईट डिनर जिवावरही बेतू शकतो.

नुकताच वर्ल्ड कँडल लाइटिंग डे साजरा करण्यात आला. त्यावेळी जाहीर केलेल्या एका अहवालात कँडल लाईट डिनरने होणाऱ्या नुकसानाचा उल्लेख करण्यात आला आहे. साऊथ कॅरोलिना स्टेट युनिव्हर्सिटीच्या काही तज्ज्ञांनी हा अहवाल सादर केला आहे. या अहवालाआधी तज्ज्ञांनी मेणबत्तीतून निघणाऱ्या धुराची तपासणी केली. त्यात पॅराफिनपासून बनलेल्या मेणबत्तींपासून निघणारा धूर हा तुमच्या फुफ्फुसांसाठी हानिकारक असतो, असं म्हटलं आहे. या धुरामुळे कर्करोग किंवा अस्थमाचा त्रास होऊ शकतो. त्याखेरीज एग्झिमा किंवा अन्य त्वचा विकारही भेडसावतात. या मेणबत्त्यांमध्ये सिगरेटच्या धुरात असलेले हानिकारक घटक आढळतात.

अर्थात, जे लोक सातत्याने मेणबत्तीच्या प्रकाशात जेवतात, त्यांना हा त्रास होतो. क्वचित कधीतरी कँडल लाईट डिनर करणं तितकं धोकादायक नसतं. तसंच मधमाशांच्या पोळ्यातून निघणाऱ्या मेणाच्या मेणबत्त्या किंवा सोयापासून बनणाऱ्या मेणबत्त्या अजिबात धोकादायक नसतात. त्यामुळे या मेणबत्त्यांचा वापर करण्याचा सल्ला वैज्ञानिकांनी दिला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या