
>> नमिता वारणकर
समाजसेवकांच्या कार्याचा नेहमीच गौरव केला जातो. लेखक सुरेश चव्हाण यांनी तयार केलेल्या ‘दासीज ऑफ यल्लम्मा’, ‘टोबॅको वर्कर्स’ या सामाजिक प्रश्नांना हात घालणाऱ्या माहितीपटांमुळे त्यांना जागतिक दर्जाच्या महोत्सवात सहभागी होण्यासाठी निमंत्रणाचे पत्र आले. या औचित्याने त्यांच्याशी साधलेला संवाद.
‘कान्स फेस्टिव्हल’ला जाण्याची संधी कशी मिळाली?
कान्स फेस्टिव्हलला जाण्याची इच्छा बऱ्याच वर्षांपासून होती, पण तिकडे जाण्यासाठी काय करावं लागतं, हे मला माहीत नव्हतं. माझे मित्र, निर्मात जी. के. देसाई यांच्या सहकार्याने मला कान्स महोत्सवाचं निमंत्रण आलं. या महोत्सवासाठी माझ्या ‘दासीज ऑफ यल्लम्मा’ आणि ‘टोबॅको वर्कर्स’ या दोन माहितीपटांची लिंक मी पाठवली होती. यंदाचं या महोत्सवाचं 75वं वर्ष होतं. योगायोगाने मला या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त कान्स महोत्सवाला जाण्याची संधी मिळाली, ही माझ्यासाठी आनंदाची गोष्ट ठरली.
सगळ्यांचे आकर्षण असलेल्या ‘रेड कार्पेट’विषयी काय सांगाल?
‘रेड कार्पेट’ हा कान्सला जाणाऱ्यांसाठी अत्यंत कुतूहलाचा विषय असतो. या वर्षी दिपिका पदुकोण होती, ती केवळ रेड कार्पेटसाठी नाही तर निवड झालेल्या चित्रपटांची परीक्षक म्हणून आली होती. संपूर्ण हिंदुस्थानातून लोकं या महोत्सवाला येतात. याशिवाय जब्बार पटेल, सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख अशा वरिष्ठांचीही येथे भेट झाली. जागतिक दर्जाच्या दिग्दर्शकांनी दिग्दर्शित केलेले चित्रपट पाहण्याची येथे संधी मिळते. तेथील चित्रपटगृहात एका वेळी अडीच ते तीन हजार रसिक प्रेक्षक बसू शकतात. छोटय़ा थिएटरमधून हिंदुस्थानातील काही चित्रपट दाखवले जातात. या वर्षीच्या महोत्सवात ‘गोदावरी’ , ‘पाचोरा’ असे काही आपल्याकडील सिनेमे दाखवण्यात आले. व्हेनिस, बर्लिन तसेच इतर देशांतील महोत्सवांमध्ये ‘कान्स’ हा सगळ्यात मोठा, मानाचा आहे. त्यामुळे कान्सला जाणं हे प्रतिष्ठेचं मानलं जातं.
महोत्सवानिमित्त राहण्याची व्यवस्था आणि सोयीसुविधा फ्रान्सच्या निस शहरात केली जाते. कान्स नावाचा परिसर आहे तेथे समुद्रकिनारी महोत्सवाचे ठिकाण असते. तेथे दरवर्षी हा महोत्सव असतो. शिवाय वेगवेगळ्या देशांचे पॅव्हेलियन तिथे असतात. जपान, फ्रान्स, इंग्लड अमेरिका, कॅलिफोर्निया, लंडन अशा प्रकारे 80 ते 90 देशांतील रसिक प्रेक्षक येथे या वेळी उपस्थित असतात. ‘कान्स’ येथे सिनेमांचं मोठं मार्केट आहे. तेथे सिनेमाच्या विक्रीची देवाणघेवाण केली जाते. सध्या ओटीटी, अमेझॉन यांनाही सिनेमे विकले जातात. तिथे वेगवेगळ्या देशांचे सिनेमांचे स्टॉल पाहायला मिळाले. तिथल्या स्टॉल्समध्ये तुमच्याकडे असलेल्या सिनेमांची माहिती त्यांना द्यावी लागते. मी माझ्याकडून माझ्या माहितीपटाच्या डीव्हीडी आणि त्याची माहिती नेली होती. त्यांची माहिती स्टॉल्सवर दिली. मी वीस ते पंचवीस देशांतील स्टॉलला भेट दिली. त्यांचे ई-मेल त्यांनी मला दिले. त्यावर त्यांना माझ्या डॉक्युमेंटरीची लिंक त्यांनी पाठवायला सांगितली. माझ्या डॉक्युमेंटरी आपल्याकडच्या प्रथा, परंपरा, देवदासी प्रथा, तंबाखू व्यवसायात काम करणाऱ्या स्त्रिया, त्यांचं होणारं शोषण, त्या महिलांचं भविष्यात काय होतं, यावर आधारित आहेत. यात केवळ मुली नाहीत, तर मुलंही असतात. जोगते आणि जोगतिणी यांच्यावर आधारित माहितीपट केल्यामुळे कान्सला जाण्याची संधी मिळाली. विशेष महोत्सवाला येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या चित्रपट क्षेत्रातल्या कार्याची येथे नोंद असते.
फ्रेंच माणसांचं वैशिष्टय़ काय जाणवलं?
फ्रेंच माणसं अत्यंत उत्साही वाटली. हिंदुस्थानविषयी त्यांना अत्यंत आपुलकी आहे, असे जाणवले. फ्रेंचमधल्या बऱ्याचशा लोकांना इंग्रजी येत नाही. ते फ्रेंचमध्येच बोलतात. तुम्ही काही त्यांना विचारलं तर ते त्यांना खूप उत्साहाने उत्तर देतात. स्टेशन किती लांब आहे, एखादा पत्ता विचारला तर आपुलकीने उत्तर देतात. हिंदुस्थानातून आलोय हे कळलं की, आपुलकीने चौकशी करतात. आपल्याकडच्या ऐकलेल्या गोष्टींविषयी कुतूहलाने प्रश्न विचारतात. रूढी, परंपरा, सण, उत्सव याविषयीही ते चौकसपणे प्रश्न विचारतात. गाडीत बोलता बोलता एका स्त्रीने मला तिच्या हिंदुस्थानात राहणाऱ्या मैत्रिणीचा फोटो दाखवला. तिथे यांत्रिक सुविधा उत्तम आहेत. लोकसंख्या 30 कोटी आहे. गर्दी कुठेच दिसत नाही. इमारत, हॉटेल्स, निमुळती कौलारू घरं सहजरीत्या बर्फ ओघळून जावा, अशी तिथे पाहायला मिळाली. रस्ते अतिशय स्वच्छ आहेत. एक दिवस मला नेहमीप्रमाणे केनसुमेरहून कान्स महोत्सवाला जाण्यासाठी स्थानकावर गाडीची वाट बघत बसलो होतो. एक मुलगी माझ्या शेजारी बसली होती. माझ्याकडे एक छोटं पाकीट होतं. ते मी सीटवर ठेवलं होतं. गाडी आल्याबरोबर ते सीटवरच राहिलं आणि मी गाडी पकडायला गेलो असता तिने बघितलं की, माझं पाकीट राहिलंय. तिने लगोलग माझं पाकीट मला आणून दिलं. तिथे सगळे प्रवाशी ट्रेनमध्ये चढल्याशिवाय ट्रेन सुरू होत नाही. सगळे दरवाजे बंद झाले की, ट्रेन सुरू होते. कितीही वेळ लागला तरी चालेल. प्रत्येक बोगीत एक माणूस रक्षणासाठी असतो. आणखी एकदा असा प्रसंग झाला की, केनसुमेरला न जाणाऱ्या एका चुकीच्या ट्रेनमध्ये मी चढणार होतो, पण मी चढू नये, हे सांगण्यासाठी एक प्रवाशी धावत धावत माझ्याकडे आला. मला न चढण्याचा सल्ला त्याने दिला. अशा प्रकारे इतरांना सहकार्य करणारे नागरिक तेथे आहेत. फ्रान्समध्ये काळा-गोरा भेद नाही. इथे चायनीज, जापनीज, कोरियन, पाकिस्तानी, बांगलादेशी, हिंदुस्थानी असे सगळ्या देशातले लोक व्यवसायानिमित्त येत असल्याचे पाहायला मिळाले.
फ्रान्समधल्या लोकांचं काय वेगळेपण जाणवलं… या महोत्सवात काय शिकायला मिळालं?
तिथली शिस्त वाखाणण्याजोगी आहे. वक्तशीरपणा जास्त आहे. तुम्हाला जे सिनेमे बघायचे आहेत, ते तुम्ही आधीच बुक करण्याची सोय आहे. आयत्या वेळी तिकीट काढून आलेल्यांची रांगही वेगळी असते. तिथले लोक निवृत्त ज्येष्ठ नागरिक बॅग तपासायला होते. प्रत्येक ठिकाणी बॅग तपासली जाते. कुठेही गडबडगोंधळ दिसत नाही. महोत्सवात छान संगीत सुरू असतं. उन्हाचाही त्रास होत नाही. तिकडची ऐंशी-पंच्याऐंशी वर्षांची माणसं रांगेत उभं राहून तिकीट काढताना दिसतात. एक वयोवृद्ध महिला हातात कॉफी आणि खाणं घेऊन सिनेमाची वाट बघत बसलेल्या दिसल्या. चार वाजता सिनेमा होता, पण त्या एक वाजल्यापासून वाट बघत बसल्या होत्या. येथील लोक सिनेमावेडे आहेत. आतापर्यंत मी बऱ्याच महोत्सवांना गेलो आहे, पण येथे बऱ्याच गोष्टींत वेगळेपण जाणवतं. बहीण-भाऊ नातं, वडील-मुलगी, आई-मुलगा वंशभेद, स्थलांतरित नागरिकांच्या समस्या या विषयावर येथील सिनेमे होतात. एका मूर्तीकार महिलेच्या घरी येणाऱ्या मांजराने कबुतरावर हल्ला केला, कबुतराला जखमी केलं. त्यामुळे त्या कबुतराची त्या महिलेने कशी देखभाल केली… प्राण्यांविषयी एखाद्या कलावंताला असणारी आत्मियता हा विषयही सिनेमाच्या माध्यमातून हाताळला जातो. म्हणूनच याला जागतिक दर्जाचे सिनेमे म्हणतात, कारण यातून खूप शिकायला मिळतं.



























































