10 महिन्यांच्या बालिकेच्या अमानुष छळ प्रकरणी महिलेस 10 वर्षांचा सश्रम कारावास

100

सामना प्रतिनिधी, अलिबाग

नवी मुंबई खारघर येथील पूर्वा प्ले स्कुल नर्सरी मधील दहा महिन्यांच्या बालिकेचा छळ केल्याप्रकरणी महिलेला 10 वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा झाली आहे. अफसाना नासिर शेख या महिलेस अलिबाग सत्र न्यायालयाने ही शिक्षा सुनावली आहे.

खारघर नवी मुंबई येथे प्रियंका निकम व प्रवीण निकम यांचे पूर्वा प्ले स्कुल नर्सरी असून लहान बालकांना सांभाळण्याचे काम करीत होते. प्ले स्कुल नर्सरीत येणाऱ्या बालकांना सांभाळण्यासाठी अफसाना नासिर शेख ही आया म्हणून काम करीत होती. 21 नोव्हेबर 2016 रोजी सकाळी 8.30 ते सायंकाळी 7.30 च्या दरम्यान आरोपी अफसाना शेख हिने नर्सरी मधील पीडित बालिका ही झोपत नव्हती. यामुळे तिने क्रूरपणे त्या बालिकेस उचलून जमिनीवर आपटले. तसेच लाथाबुक्क्याने मारहाण केली. त्याचबरोबर डोळ्यात तिखट मीठ व भाजी टाकून तोंड दाबून मारहाण करून छळ केला.

या घटनेनंतर पीडित बालिकेच्या आईने खारघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. त्यानंतर खारघर पोलिसांनी तपास पूर्ण करून आरोपी विरोधात सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सदरच्या खटल्पाची सुनावणी मा. सत्र न्यायाधीश, अ. सो. वाधवसे यांचे न्यायालयात झाली. या केसमध्ये सरकार पक्षातर्फे अतिरिक्त शासकीय अभियोक्ता अँड अश्विनी बांदिवडेकर-पाटील यांनी एकूण 10 साक्षीदारांची साक्ष नोंदविली, सदर केसमध्ये फियादी तसेच वैद्यकीय अधिकारी डॉ. गावडी यांची साक्ष महत्वाची ठरली. तसेच पोलीस निरीक्षक सोनावणे यांची साक्ष महत्त्वाची ठरली तसेच पैरवी अधिकारी ठाकूर यांचे सहकार्य मोलाचे ठरले.

सरकार पक्षातर्फे अति शासकीय अभियोक्ता ऍड. अश्विनी बांदिवडेकर-पाटील यांनी न्यायालयासमोर केलेला युक्तीवाद ग्राहय धरुन मा, सत्र न्यायालयाने दिनांक 26 मार्च 2019 रोजी आरोपी अफसाना नासीर सेख हिस भा.दं.वि.कलम 307 खाली दोषी ठरवून दहा वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा व एक हजार रुपये दंड तसेच भा.दं.वि.कलम 325 खाली दोषी ठरवून सात वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा व तीन हजार रुपये दंड अशी शिक्षा ठोठावली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या