
कोरोनामुळे रोख रक्कम वापरण्याचे प्रमाण 17 टक्क्यांनी वाढले आहे. फक्त हिंदुस्थानच नव्हे तर अमेरिकेतही याचा प्रभाव दिसून येत आहे.
अमर उजाला या हिंदी दैनिकाने याबाबत वृत्त दिले आहे. नोटबंदीनंतर हिंदुस्थानात ऑनलाईन व्यवहारांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती. परंतु कोरोनामुळे पुन्हा रोख रक्कम वापरण्याचे प्रमाण वाढले आहे. गेल्या 20 वर्षात रोख रक्कम वापरण्याचे प्रमाण हे 15 टक्के इतके होते. आता 2020-21 या वर्षात रोख रक्कम वापरण्याचे प्रमाण 17.2 टक्क्यांनी वाढले आहे. असे असले तरी युपीआयच्या माध्यमातून 7.71 लाख कोटींचे व्यवहार झाले आहेत.
हिंदुस्थानातच नव्हे तर अमेरिकेतही नागरिकांचा रोख रक्कम वापरण्याकडे कल वाढला आहे. अमेरिकेत 16 टक्क्यांनी रोख रकमेचा वापर वाढला असून 2.07 लाख डॉलर रोख रक्कम वापरली गेली आहे. आर्थिक अनिश्चितता वाढल्यानंतर रोख रक्कम वापरले जाण्याचे प्रमाण वाढल्याचे सांगण्यात येत आहे. जीडीपीच्या तुलनेत रोख रक्कम वापरण्याचे प्रमाण 11-12 टक्के इतके होते. परंतु कोरोन संकटानंतर रोखीने व्यवहार करण्याचे प्रमाण 17 टक्क्यांनी वाढले आहे.
पाच वर्षात 11.43 लाख कोटींचे चलन वाढले
2016 साली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटबंदी करून डिजिटल व्यवहार वाढतील असा अंदाज व्यक्त केला होता. परंतु 4 नोव्हेंबर 2016 रोजी देशात 17.74 लाख कोटी रुपयांच्या नोटा चलनात होत्या. आता 29 ऑक्टोबर 2021 रोजी यात वाढ होऊन 29.17 लाख कोटी रुपयांचा नोटा चलनात आहेत. नोटबंदीमुळे 1.1 लाख कोटी रुपयांच्या नकली नोटा समोर आल्या होत्या. गेल्या आर्थिक वर्षात 500 आणि 2 हजार रुपयांचचे प्रमाण हे 85.7 टक्के आहे.




























































