
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
लोकसभा आणि हरयाणाची विधानसभा निवडणूक नजीक आली असतानाच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री भूपिंदरसिंग हुड्डा यांच्या रोहतक येथील घरासहित त्यांच्याशी संबंधित 20 ठिकाणांवर सीबीआयने आज धाडी घातल्या.
हरयाणाचे मुख्यमंत्री असताना हुड्डा यांनी काही बिल्डरांवर मेहेरबान होत भूसंपादन केले हाते, असा आरोप आहे. आधीच दोन प्रकरणांमध्ये सीबीआय चौकशीला तोंड देत असलेले हुड्डा यांच्या विरोधात गुरुग्राम येथील 1 हजार 417 एकरची जमीन बेकायदा वितरित केल्याच्या आरोपाखाली सीबीआयने आज गुन्हा दाखल केला. हे जमीन वाटपाचे प्रकरण 2009-2012 दरम्यानचे आहे.
हुड्डा यांच्या विरोधात दाखल झालेल्या नव्या गुन्ह्यात हरयाणाचे अतिरिक्त मुख्य सचिव त्रिलोकचंद गुप्ता यांच्यासहित 15 बिल्डरांना आरोपी करण्यात आले आहे. माजी मुख्यमंत्री हुड्डा यांच्या रोहतक येथील घरावर सीबीआयची धाड पडली तेव्हा स्थानिक खासदार असलेले त्यांचे पुत्र दीपिंदरसिंग हुड्डा हे घरातच होते. हुड्डा यांच्या हरयाणा, दिल्ली, पंजाब येथील 20 ठिकाणी धाडी टाकून सीबीआयने झाडाझडती घेतली.
हा तर राजकीय सूड – हुड्डा
आपल्या घरावर धाड टाकणाऱया सीबीआय अधिकाऱयांना आपण पूर्ण सहकार्य केले. मात्र धाडीत त्यांना काहीही सापडले नाही असे सांगतानाच केंद्रातील भाजप सरकारचे हे राजकीय सूडाचे राजकारण आहे, असा स्पष्ट आरोप माजी मुख्यमंत्री भूपिंदरसिंग हुड्डा यांनी केला.
मोदींना पराभव दिसू लागलाय – आनंद शर्मा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लोकसभा निवडणुकीतील भाजपचा पराभव स्पष्ट दिसू लागला आहे. त्यांच्या सरकारचे अवसान गळाले आहे. काँग्रेस नेत्यांविरोधात कारवायांमागे तेच कारण आहे, असे ज्येष्ठ काँग्रेसनेते आनंद शर्मा यांनी म्हटले आहे. सरकारे ही कायमसाठी नसतात. मोदी सरकारचे तर आता काही आठवडेच शिल्लक आहेत. सरकारी अधिकाऱयांनी याचा विसर पडू देऊ नये, असा इशाराही शर्मा यांनी दिला.आली आहे.





















































