शीना जिवंत असल्याचा  इंद्राणीचा दावा सीबीआयने फेटाळला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हायप्रोफाईल शीना बोरा हत्याकांडात नवे ट्विस्ट आले आहे. शीना जिवंत असून ती कश्मीरमध्ये आहे, असा इंद्राणी मुखर्जीने केलेला दावा सीबीआयने फेटाळला आहे. हा दावा म्हणजे इंद्राणीची केवळ एक कल्पना आहे, असे सीबीआयने म्हटले आहे. त्यावर इंद्राणी न्यायालयातच भडकली व तिने सीबीआयचे म्हणणे खोडून काढले. या आरोप-प्रत्यारोपामुळे शीना बोरा प्रकरण पुन्हा चर्चेत आले आहे.

शीना जिवंत असून कश्मीरात तिची माजी पोलीस निरीक्षक आणि आशा कोरकेशी भेट झाली. त्यामुळे सीबीआयने शीनाचा कश्मीरात शोध घ्यावा, असे म्हणणे इंद्राणीने एका अर्जातून न्यायालयात मांडले. त्यावर लेखी उत्तर देत सीबीआयने इंद्राणीचा दावा फेटाळला आहे. इंद्राणीच्या अर्जात काही दम नाही. सुनावणी रखडवण्यासाठी तिने न्यायालयात अर्ज केला आहे. शीना जिवंत असणे अशक्य आहे. इंद्राणीचा दावा म्हणजे तिची एक कल्पना आहे, असे सीबीआयने म्हटले आहे. त्याला इंद्राणीने अॅड. सना खान यांच्यामार्फत प्रत्युत्तर दिले आहे. महाराष्ट्र पोलीस दलात 25 वर्षे सेवा केलेल्या आशा कोरकेच्या जबाबापेक्षा चालक श्याम रायच्या खोटय़ा कथेवर सीबीआयने विश्वास ठेवणे हे अत्यंत निंदनीय असल्याचे तिने म्हटले आहे.

इंद्राणीची सीबीआयवर पुन्हा आगपाखड

इंद्राणी मुखर्जीने सीबीआयच्या उत्तरावर भडकत पुन्हा आगपाखड केली आहे. गेली दोन वर्षे खटला चालवला गेला नाही, त्यात माझा काही दोष नाही. सीबीआयने मला हत्येच्या खोटय़ा प्रकरणात गोवण्याचा प्रयत्न केला आहे. उपलब्ध पुराव्यांवरून मी निर्दोष असल्याचे सिद्ध होते. आशा कोरकेचा जबाब नोंदवून घेतला तर आपल्या दर्जाहीन, चुकीच्या तपासाचा पर्दाफाश होईल म्हणून सीबीआय घाबरतेय, असे प्रत्युत्तर इंद्राणीने दिले आहे.