
मध्य रेल्वेच्या हार्बर मार्गावरून पनवेल गाठणे म्हणजे दुसऱया ग्रहावर गेल्यासारखे वाटते अशा प्रवाशांच्या प्रतिक्रिया असतात. या मार्गाच्या शेजारून सीएसएमटी ते पनवेल अशा फास्ट एलिवेटेड प्रकल्प जाणार होता, परंतु मेट्रोच्या कामांमुळे हा प्रकल्प बासनात गुंडाळून ठेवण्यात आला आहे. आता या मार्गावर निदान सीबीटीसी ही अत्याधुनिक सिग्नल प्रणाली तरी लागू करण्यात यावी अशी मागणी होत आहे. केंद्र सरकारने अलीकडेच ‘सुरक्षा कवच’ नावाची टक्करविरोधी यंत्रणा विकसित केली आहे. त्यामुळे काही नवीन आयडिया सुचवण्यासाठी रेल्वे बार्डाने सीबीटीसी प्रकल्प आपल्या ‘इनोव्हेशन पोर्टल’वर टाकला आहे.
मेट्रोच्या धर्तीवर अत्याधुनिक सिग्नल यंत्रणा असलेला सीबीटीसी प्रकल्प (कम्युनिकेशन बेस ट्रेन कंट्रोल सिस्टम) राबविण्यासाठी रेल्वे बोर्डाने नवीन संकल्पनेतून काही तंत्र विकसित होते का ते पाहण्यासाठी वेट अॅण्ड वॉच भूमिका घेतली आहे. हार्बरवर अप आणि डाऊन अशा दोनच धिम्या मार्गिका आहेत. तसेच डॉकयार्डपासून हा मार्ग एलिवेटेड स्वरूपाचा आहे. हा मार्ग वळणदार असल्याने येथे प्रतितास 100 कि.मी.च्या वेगाने लोकल धावू शकत नाही. पनवेलहून मुंबई गाठण्यास तब्बल 79 मिनिटे म्हणजे 1 तास 19 मिनिटे लागतात. हार्बरवर बहुचर्चित एलिवेटेड फास्ट कॉरिडॉर झाला असता तर हाच प्रवास अवघ्या 45 मिनिटांत झाला असता. यासाठी साडेसहा हजार कोटींचा खर्च येणार आहे. आता मेट्रो मार्गिकेमुळे फास्ट एलिवेटेड प्रकल्पही बाजूला पडला आहे.
हार्बरचा इतिहास…
हार्बरचा उन्नत दुहेरी धिमा मार्ग जीआयपीआरच्या काळात 1921 साली बांधला होता. या मार्गावर कुर्ला ते सीएसएमटी ही विजेवर धावणारी पहिली ईएमयू-लोकल 3 फेब्रुवारी 1925 रोजी धावली. 9 मे 1992 मध्ये मानखुर्द ते वाशी सेवा तर 93 साली बेलापूरपर्यंत लोकल सुरू झाली.
सीबीटीसी प्रकल्प रेल्वे बार्डाने इनोव्हेशन पोर्टलवर ठेवला आहे. रेल्वेने अलीकडेच देशी तंत्रज्ञानाने टक्करविरोधी यंत्रणा विकसित केली आहे. त्यामुळे सीबीटीसीवर अधिक संशोधन सुरू आहे.
सुभाष चंद गुप्ता, सीएमडी, मुंबई, रेल्वे विकास महामंडळ


























































