हवेत गोळीबार करून वाढदिवस साजरा केला; बर्थडे बॉयला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

>> प्रसाद नायगावकर

पोलीस रेकार्डवरील आरोपीकडून वणी पोलिसांनी विदेशी बनावटीची रिव्हाल्वर जप्त केल्याची घटना राजूर भांदेवाडा मार्गावर घडली. शेतात वाढदिवसाची पार्टी करत असताना पोलिसांनी छापा टाकत आरोपीला ताब्यात घेतले. उमेश किशोरचंद राय (34, रा. महादेव नगरी, चिखलगाव) असे सराईत आरोपीचे नाव आहे. हवेत गोळीबार करून वाढदिवस साजरा केल्याचे आरोपीने कबूल केले. याप्रकरणी गुन्हा दाखल झाला असून बर्थडे बॉयला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

सध्या नेत्यांचे, दादांचे, भाईंचे त्यांच्या समर्थकांकडून वाढदिवस साजरे करण्याचे फॅडच आले आहे. अनेकदा असे वाढदिवस साजरे करत असताना घातक शस्त्रांचा वापर करून वाढदिवस साजरे केले जातात. असे वाढदिवस साजरे करणाऱ्यांवर पोलिसांनी कारवायाही केल्या आहेत. अशीच घटना चिखलगावमध्ये घडली आहे. एक सराईत गुन्हेगार आपल्या साथीदारांसह एका शेतात पार्टी करून आपला वाढदिवस साजरा करीत होता. त्यावेळी त्याने गोळीबारही केला.

राजूर भांदेवाडा मार्गावर मनोज कश्यप यांच्या शेतात डीजे लावून नाचगाणे करून धिंगाणा करीत वाढदिवसाची पार्टी होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. माहितीवरून ठाणेदार अजित जाधव यांना माहिती देत त्यांच्यासह सपोनि दत्ता पेंडकर व पोलीस पथक रात्री 2.30 वाजता शेतात गेले. पोलिसांना बघून दारू पिऊन नाचणारे अनेकजण पळून गेले. आरोपी उमेश राय हा पोलिसांना पाहून पळून जात असताना पोलिसांनी त्याचा पाठलाग करीत त्याला जेरबंद केले. पोलिसांनी त्याला तत्काळ ताब्यात घेत त्याची झडती घेतली. त्याच्याकडे विदेशी बनावटीची रिव्हाल्वर पोलिसांनी मिळाली. सोबतच वाढदिवस पार्टी करीत असताना त्याच पिस्तुलमधून दोन राउंड हवाई फायर केल्याची कबुलीही त्याने दिली. पोलिसांनी कारतूसचे 2 रिकामे कव्हरही जप्त केले. या प्रकरणी वणी पोलीस ठाण्यात त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

उमेश राय हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर खून ,अपहरण यासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. एका वर्षांपूर्वी खुनाच्या गुन्ह्यातून कारागृहातून बाहेर पडला होता. उमेशकडे विदेशी बंदूक असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलीस त्याच्या मागावरच होते. अखेर तो पोलिसांच्या तावडीत सापडला आहे.