मध्य रेल्वेवर आजपासून 15 डब्यांच्या 10 नव्या फेऱ्यां, गर्दीतील रेटारेटी कमी होणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मध्य रेल्वेच्या मेन लाईनवर सोमवारपासून 15 डब्यांच्या 10 नवीन फेऱ्यां चालवण्यात येणार आहेत. सध्या प्रवासी सेवेत धावणाऱ्यां 12 डब्यांच्या लोकलच्या जागी या 15 डब्यांच्या लोकल धावणार आहेत. त्यामुळे कल्याण, बदलापूर, कर्जत, कसारा मार्गावरील प्रवाशांना गर्दीच्या वेळेत मोठा दिलासा मिळणार आहे. या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रवासी संघटनांनी मध्य रेल्वे प्रशासनाच्या या भूमिकेचे स्वागत केले आहे. नव्या लोकल फेऱ्यांमुळे मध्य रेल्वे मार्गावरील 15 डब्यांच्या फेऱ्यांची संख्या 32 वर पोहोचणार आहे.

मध्य रेल्वे मार्गावर धावणाऱ्यां लोकल ट्रेनमधील गर्दीचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत आहे. वाढत्या गर्दीमुळे अपघाती मृत्यूचे प्रमाण वाढत चालले आहे. ही गंभीर परिस्थिती सुधारण्यासाठी मध्य रेल्वे प्रशासनाने सोमवारपासून 15 डबा लोकलच्या 10 फेऱ्यां सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या गाडय़ा 12 डब्यांच्या लोकलच्या जागी चालवण्यात येणार आहेत. त्यामुळे मध्य रेल्वेच्या एकूण लोकल फेऱ्यांची संख्या 1820 इतकीच मर्यादित राहणार आहे. लोकलच्या फेऱ्यां न वाढवता जादा डब्यांच्या गाडय़ांद्वारे प्रवासीक्षमता वाढवून गर्दीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न रेल्वे प्रशासनाकडून केला जात आहे. पीक अवर्समध्ये 15 डब्यांच्या लोकल फेऱ्यां वाढल्यामुळे रेल्वे स्थानकांवरील आणि गाडय़ांमधील गर्दी विभागली जाणार आहे. याचा अंबरनाथ, बदलापूर, कर्जत, कसारा या भागांतून मुंबईत येणाऱ्यां प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.

 मध्य रेल्वेच्या उपनगरी मार्गावर सर्वप्रथम 16 ऑक्टोबर 2012 रोजी 15 डब्यांची लोकल सेवा सुरू झाली होती. त्यावेळी 16 लोकल फेऱ्यां सुरू करण्यात आल्या. नंतर 4 मार्च 2019 आणखी सहा फेऱ्यां वाढवण्यात आल्या आणि 15 डब्यांच्या फेऱ्यांची एकूण संख्या 16 वरून 22 पर्यंत वाढली. आता 20 जुलैपासून आणखी 10 फेऱ्यांची भर पडणार असल्याने मध्य रेल्वे मार्गावरील 15 डब्यांच्या एकूण फेऱ्यांची संख्या 32 होणार आहे.