लॉकडाऊनमध्ये मध्य रेल्वेची 35 दशलक्ष टनाची मालवाहतूक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
फाईल फोटो

 मध्य रेल्वेने 23 मार्च ते 12 नोव्हेंबर या लॉकडाऊनच्या तब्बल 35 दशलक्ष टन मालाची मालवाहतूक केली आहे. यामध्ये 2.55 लाख वॅगनमधून कोळशाची वाहतूक केल्याने देशातील वीज पुरवठा या काळात सुरक्षित ठेवण्यास मदत झाली आहे.

कोरोना साथीच्या फटक्याने देशभरातील प्रवासी वाहतूक बंद करण्यात आली होती. मात्र, रेल्वेची मालवाहतूक या कसोटीच्या काळातही सुरू ठेवण्यात आली होती. मध्य रेल्वेने 23 मार्च ते 12 नोव्हेंबर या काळात 6.55 लाख वॅगनमधून (मालडबे) 35 दशलक्ष टन जीवनावश्यक मालाची मालगाडय़ांद्वारे वाहतूक केली आहे. उर्जा आणि पायाभूत प्रकल्पांसाठी वेळेत माल पोहचावा यासाठी रेल्वेने ‘कोविड-19’ लॉकडाऊन आणि अनलॉक काळातही मालगाडय़ा चालूच ठेवल्या होत्या. 23 मार्च ते 12 नोव्हेंबरच्या काळात एकूण 6 लाख 55 हजार 28 वॅगनद्वारे मालवाहतूक करण्यात आली. एकूण 13,619 मालगाडय़ांमधून कोळसा, अन्नधान्य, साखर, कांदा, पेट्रोलियम पदार्थ, लोखंड, स्टील, सिमेंट, खते, कंटेनर अशा नाना प्रकारची वाहतूक करण्यात आली.

नागपूर डिव्हीजनचा विक्रम

 12 नोव्हेंबर या दिवशी तर सर्वाधिक 2.67 लाख टन मालाची वाहतूक करण्यात यश आले आहे. मध्य रेल्वेच्या नागपूर डिव्हीजनने सर्वाधिक 2,664 वॅगन लोडींग करण्याचा विक्रम 12 नोव्हेंबर रोजी केला आहे. यापूर्वी नागपूर डिव्हीजनने सर्वाधिक 2,641 वॅगन लोड करण्याचा विक्रम 5 नोव्हेंबर रोजी केला आहे.